Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सर्व देवदेवता महाराष्ट्रातच, गुवाहाटीला जायची गरज नाही; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 21:20 IST

२६ नोव्हेंबर रोजी त्यांनी काही आमदारांसह पुन्हा एकदा कामाख्या देवीचे दर्शनही घेतले.

मुंबई ते गुवाहाटी या शिंदे गटाच्या गाजलेल्या दौऱ्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले आणि मुख्यमंत्री झाले. दरम्यान, यानंतर २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी काही आमदारांसह पुन्हा एकदा कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी टीकेचा बाण सोडला आहे. “आमचे सर्व देवदेवता महाराष्ट्रातच आहेत, आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही,” असं म्हणत राऊत यांनी टोला लगावला.

“महालक्ष्मीची मला सुंदर मूर्ती भेट दिली. मी शुभदा ताईंना सांगितलं आमचे सर्व देवदेवता महाराष्ट्रातच आहेत, आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही. मुंबादेवी असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका देवी असेल एकवीरा देवी असेल सर्व देवतांची रुपं महाराष्ट्राच्या भूमीत आहेत. फारतर आम्ही कोंबडी बकरी कापतो, रेडेवगैरे कापत नाही,” असं राऊत म्हणाले. मुंबईतील कांदिवली चारकोप परिसरात आयोजित एका कार्यक्रमाला राऊत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य आमदारांवर निशाणा साधला.

“मी तुरुंगातून सुटल्यानंतर शुभदा ताई मला भेटायला आल्या आणि त्याच ठिकाणी त्यांनी मला आमंत्रण दिलं. ते माझं कार्यक्रमाचं पहिलं आमंत्रण होतं. तुरुंगातून सुटल्यावर मला कोणी बोलवेल का नाही असं वाटलं होतं. लोक मला विसरले असतील असं वाटलेलं. पण शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे एक समीकरण आहे. महाराष्ट्र आणि देश कधी विसरू शकत नाही. जोपर्यंत कोंकण शिवसेनेच्या पाठिशी आहे, तोवर किती शिंदे मिंदे आले आणि गेले तोपर्यंत कोणी शिवसेनेचं काही वाकडं करू शकत नाही,” असंही ते म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेसंजय राऊत