संजय राऊतांनी हॉस्पिटलमधून केली पोस्ट; म्हणाले, 'कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:13 IST2025-11-06T13:56:18+5:302025-11-06T14:13:26+5:30
वैद्यकीय सल्ल्यानुसार संजय राऊत काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार आहेत.

संजय राऊतांनी हॉस्पिटलमधून केली पोस्ट; म्हणाले, 'कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे...'
Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असून, वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांची लेखणी थांबली नसल्याचे त्यांनी आज एका भावनिक सोशल मीडिया पोस्टमधून दाखवून दिले.
संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंवरून रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केला. या फोटोत त्यांच्या एका हाताला सलाईन लावलेली दिसत आहे, तर दुसऱ्या हाताने ते एका कागदावर काहीतरी लिहीत आहेत. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. "हात लिहिता राहिला पाहिजे! कसेल त्याची जमीन लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता!", असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यांच्या या पोस्टमधून सामना वृत्तपत्रातील त्यांची लेखणी थांबणार नसल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी विरोधकांना दिला आहे.
हात लिहिता राहिला पाहिजे
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 6, 2025
कसेल त्याची जमीन
लिहील त्याचे वृत्तपत्र
हा आमच्या पिढीचा मंत्र होता! pic.twitter.com/AowQ9MhfLN
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून ब्रेक
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले होते. "सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात (जानेवारी २०२६) आपल्या भेटीस येईन, असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली काळजी
राऊत यांच्यावर सध्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून, शरीरातील पांढऱ्या पेशी अचानक कमी झाल्याने त्यांना तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रेक घेतल्याची माहिती सार्वजनिक केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची त्वरित दखल घेतली होती. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत, "संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो," असे म्हटले
पंतप्रधानांनी काळजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनीही त्यांचे आभार मानले होते. "आदरणीय पंतप्रधानजी आपले धन्यवाद! माझे कुटुंब आपले आभारी आहे!" अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती.