Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 13:19 IST

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे.

मुंबई: भाजपा नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व आले आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमागचे कारण कळू शकले नाही. मात्र, या भेटींमुळे भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

विशेषतः मुंबई महापालिकेत मनसेबरोबर यावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. भाजपा आणि मनसेला युती करण्याची गजर नाही, कारण आधीच दोघांची छुपी युती झाली आहे. त्याला सामना करण्याची ताकदही शिवसेनेत आहे. मनसे ज्यांच्यासाठी भोंगा वाजवत होते, त्यांना आता मनसेची गरज लागत नाहीय. त्यामुळे विनोद तावडे, आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी जात असतात, असा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केला आहे. 

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या दीड महिन्यात राज आणि आगामी फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे. मागील महिन्यात फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सोमवारीच भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

मनसेची आक्रमक हिंदुत्व भूमिका

गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या भूमिकेवरून देशासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपानं पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर अलीकडेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांची थेट पाठराखण केली. जे इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक बोलतो तेच नुपूर शर्मा बोलल्या. त्यात चुकलं कुठे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमनसेभाजपासचिन अहिर