Join us
Daily Top 2Weekly Top 5

“१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनीदेखील केला नव्हता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 09:06 IST

राज्यपालांच्या वक्तव्यावरून राऊतांचा संताप. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं.

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काही सवाल केले आहेत.

“महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओदेखील यासोबत ट्वीट केला आहे. “थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..दिल्ली पुढे किती झुकताय?,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. आता तरी ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.  मराठ्या तुलाच उठावे लागेल, असंही त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.काय म्हणाले होते राज्यपाल?“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

टॅग्स :संजय राऊतभगत सिंह कोश्यारीशिवसेनाएकनाथ शिंदे