Join us

शिंदे गटात येताच किर्तीकरांचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण; म्हणाले, “एवढ्यासाठीच थांबलो होतो…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 09:28 IST

गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यामुळे, शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली.

“एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला, एका योग्य मार्गानं शिवसेना नेण्याचा त्यांचा मानस मला स्पष्ट दिसला. शिवसेनेची विचारधारा, बाळासाहेबांची जी विचारधारा आहे, हिंदुत्वाचे विचार आहेत याची जपणूक करून ही संघटना अंगी कारली. त्यात ते मार्गक्रमणही करत आहे, त्यामुळे माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना आपुलकीनं पुढे नेत आहेत, म्हणून मी यात प्रवेश केला,” असं स्पष्टीकरण गजानन किर्तीकर यांनी दिलं. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

सगळ्याच खासदारांनी सांगितलं…“आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, त्यांच्यासोबत प्रवास करू नका असं सांगितलं. सगळ्या खासदारांनी सांगितलं. मी हे भाषणातही सांगितलं. सगळ्या खासदारांनी सांगितल्यावरही त्यात बदल झाला नाही. त्यामुळे १२ खासदार गेले. काही बदल होतो का हे पाहण्यासाठी मी थांबलो होतो. समेट करा असंही सांगितलं. दसरा मेळावा इतक्या भव्य प्रणामात होतो, तर या दोन्हींची ताकद एकत्र आली, समेट घडला तर शिवसेना किती मोठी होऊ शकेल,” असंही ते म्हणाले.

प्रियंका चतुर्वेदींना थेट राज्यसभा“राजकीय धोरण म्हणून प्रियंका चतुर्वेंदींना राज्यसभा दिली. त्या काँग्रेसमध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्या होत्या. त्या शिवसेनेत कधी आल्या हे समजलं नाही. एकदा वर्षा गायकवाड भेटल्या तेव्हा त्यांनी यांना थेट राज्यसभा दिली, आमच्याकडे १० वर्ष असत्या तरी आम्ही विधानपरिषदही दिली नसती असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी अढळरावांची, चंद्रकांत खैरेची आठवण झाली नाही. संघटना कशी बांधायची असते यावर लक्ष आपल्या नेतृत्वानं द्यायला हवं होतं,” असंही किर्तीकर म्हणाले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेगजानन कीर्तीकरशिवसेना