Andheri Bypoll: “शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:31 IST2022-10-12T15:30:37+5:302022-10-12T15:31:45+5:30
Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्यावरून शिवसेनेने इकबाल चहल यांच्यावर आगपाखड केली आहे.

Andheri Bypoll: “शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?”
मुंबई: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात पोटनिवडणुकीसाठीची लढत पाहायला मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्यापही महापालिकेने मंजूर केला नसल्यावरून आता आयुक्त इकबाल चहल यांच्यावर शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, असा गंभीर आरोप शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
ऋतुजा लटके स्वखुशीने राजीनामा देत आहेत. त्यांचा राजीनामा दाबून ठेवला जात आहे. असे असताना ते दावा करतात की, आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललो आहे. मग लोक प्रश्न का विचारणार नाही? महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात पाहिलं आहे की, जे आमदार विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत, दादागिरीची भाषा करत आहेत त्यांना नियम लागू होत नाही. त्यांच्यावर केसेस नाहीत, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
नियमांना पायदळी तुडवत आहेत
शिंदे-फडणवीस सरकारला पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यावर दबाव आणत आहे. सनदी अधिकारी नेहमी नियमाने काम करतात. मात्र, इथे इकबाल चहल त्यांना घाबरत आहेत. शिंदे-फडणीस सरकार इकबाल चहल यांना घाबरवत आहे. तसेच नियमाची पायमल्ली करत आहेत. नियमांना पायदळी तुडवत आहेत, या शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, ऋतुजा लटके यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बांधिलकी आहे. त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिली. एवढंच नव्हे, तर नियमाप्रमाणे, नोकरी सोडताना एक पूर्ण पगार पालिकेकडे भरला आहे. मात्र, डीएमसी मिलिंद सावंत, आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांना नियमाने कामं करायची नसतील, तर आमचे म्हणणे आहे की ‘चले जाव’. त्यांनीही पालिकेतून निघून जावे. मुंबई महानगरपालिका, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू आहे, असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"