Join us  

तुकडे करायला शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, संजय राऊतांनी बंडखोरांना घेतलं शिंगावर, दिलं थेट आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 10:23 AM

Sanjay Raut: विधिमंडळात शिवसेना कमकुवत झाली असली तरी राज्यात शिवसेना तीच आहे. कुठलाही गट शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तुकडे करायला शिवसेना ही काय युक्रेन नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना ललकारले आहे.

मुंबई/नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. या घटनेनंतर शिवसेना नेते संजय राऊत बंडखोर आमदारांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ज्याच्या हाती ससा तो पारधी या म्हणीनुसार न्याय सुरू आहे. विधिमंडळात शिवसेना कमकुवत झाली असली तरी राज्यात शिवसेना तीच आहे. कुठलाही गट शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तुकडे करायला शिवसेना ही काय युक्रेन नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना ललकारले आहे.

आज दिल्लीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ नाही. ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. आज विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल. पण महाराष्ट्रात, ग्रामीण भागात शहरा शहरात शिवसेना तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणजे शिवसेना कमजोर झाली असं म्हणणं हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा अपमान आहे. राज्यातील जनता बाळासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे.

संजय राऊत पुढे म्हणालेत की, तुमचा मूळ पक्ष शिवसेना आहे. तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आला आहेत. शिवसेनेने तुम्हाला निवडून आणण्यासाठी शर्थ केलीय. आता तुम्ही फुटलात. बाहेर गेलाय. आता मग तुमचा पक्ष शिवसेना कसा असू शकतो. हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. मग कायद्याला विचारा. आज आम्ही शिवसेनेचे सदस्य आमदार राहिलो आहोत का हे मनाला विचारून बघा. हा प्रश्न विधानसभेचे अध्यक्ष आणि विधिमंडळ सचिवालयालाही पडला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच पक्षातील फुटीविरोधात आम्ही कायदेशीर लढू. ती लढावीच लागेल. ११ तारखेला महत्त्वाची सूनावणी होणार आहे. खरं म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची याचिका प्रलंबित असताना अशा निवडणूक घेणे बेकायदेशीर आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही. तोपर्यंत निर्णय घेणे घटनाबाह्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या विधिमंडळातील लढाया सुरूच राहतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी मराठीत म्हण आहे. ती समजून घेतली पाहिजे. पीठासीन अधिकारी सत्ताधारी पक्षाचा माणूस असतो. तो त्यांच्या बाजूने निर्णय घेत असतो. पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून शरद यादव यांचं निलंबन व्यंकय्या नायडू यांनी केलं होतं. मात्र तो न्याय राज्यात लावायला गेलो तर तो लावला गेला नाही. जो सत्तेवर आहे त्याच्या कलाने न्याय द्यायचा याला मी न्याय म्हणत नाही. झिरवळ यांनी १६ आमदारांनी व्हिप झुगारल्याचा निर्णय दिला. मात्र त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या दुसऱ्या अध्यक्षांनी निर्णय बदलला. हे रामशास्त्र्यांचं राज्य नाही. ही राजकीय चढाओढ आहे. त्यातून महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला काय मिळणार, असेही त्यांनी विचारले.

दरम्यान, जोपर्यंत मुंबई महाराष्टात शिवसेना मजबूत आहे. तोपर्यंत दिल्लीकरांचे इरादे सफल होणार नाहीत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगतो. तसेच सध्या महाराष्ट्रात असलेली व्यवस्था ही तात्पुरती आहे. ती फार काळ टिकणार नाही. भाजपाला शिवसेना फोडायची होती. त्यांनी ती फोडून दाखवली, असेही राऊत पुढे म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ