Join us

राज ठाकरेंचे नगरसेवक फोडल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 06:01 IST

उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई: माझा पक्ष शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेला नाही. माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी राज ठाकरेंच्या मनसेवरही भाष्य केलं. जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करुनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. यावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. ही घटना मी कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी संतप्त झालेल्या राज यांनी दिली होती. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 'माझी पार्टी ही रिजिनल पार्टी असली, तरी ती ओरिजनल आहे. माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. माझ्याच पक्षातून गेलेली माणसं नंतर पक्षात परत आली, तर त्यात फोडाफोडी कुठून आली?, असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. 'मुळामध्ये जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करुनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं? जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आलं असेल तर मी कुठे काय फोडलं? विचार तोच, माणसं तीच, नवीन काय केलंत? निर्माण काय केलंत?,' असे सवाल करत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लक्ष्य केलं.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराज ठाकरेमनसे