Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेही ॲक्टिव्ह; विभागप्रमुखांची बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:40 IST

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले.

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी बैठक घेत अमित शाह यांनी भाजपाचे नेते, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कानमंत्र दिले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे, असं अमित शाह यांनी सांगितलं.

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शेवटची निवडणूक आहे, असं समजा आणि लढा, असं सांगितलं.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा जोरदार तयारी केली असताना आता शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिवसेनेने ७ ऑगस्ट म्हणजेच उद्या विभागप्रमुख आणि महिला संघटकांची बैठक बोलावली आहे. मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडणार आहे. 

दोन जागांसाठी उद्धव ठाकरेंनी युती तोडली-

उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. असा गौप्यस्फोटही अमित शाह यांनी केला. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असं अमित शाह यांनी सांगितले. स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअमित शाहशिवसेना