Join us  

राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:48 PM

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सल्ला

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवणं थांबवा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमीचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीला विलंब होत असल्याची भूमिका भाजपाकडून सातत्यानं मांडली जाते. त्याचा संदर्भ देत न्यायालयाकडे बोट दाखवणं थांबवा, असा सल्ला उद्धव यांनी सरकारला दिला. त्यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.उद्धव ठाकरे गेल्याच महिन्यात अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी केली. सरकारनं संसदेत राम मंदिराच्या उभारणीचं विधेयक आणावं. शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असं उद्धव यांनी अयोध्या दौऱ्यात म्हटलं होतं. आजही उद्धव यांनी हाच सूर आळवला. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करावं लागतं, असा टोलादेखील त्यांनी लगावला. 'मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नहीं बनायेंगे खूप झालं. अयोध्येत राम मंदिर कधी बांधणार, याची तारीख मला सांगा,' असं उद्धव ठाकरे अयोध्येतील त्यांच्या भाषणात म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीबद्दल चर्चा केली. 'राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय दाहक आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखी भयंकर होत जाईल. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी भागात जाऊन जनतेशी संवाद साधा आणि त्यांना नेमकं काय हवं आहे, ते जाणून घ्या, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,' असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काल उद्धव यांनी राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरुन पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश दिले. याशिवाय अधिक आक्रमक होण्याचा सल्लादेखील मंत्र्यांना दिला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्याराम मंदिरनरेंद्र मोदीभाजपाशिवसेना