Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनीही लावला जावईशोध; 'बेस्ट'च्या तोट्याचा नव्याने बोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 19:42 IST

उद्धव ठाकरेंना सापडलं बेस्टच्या तोट्यामागचं कारण

मुंबई: देशातील ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीसाठी ओला, उबरला जबाबदार धरणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्या होत्या. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सीतारामन यांची री ओढली आहे. ओला, उबरमुळेबेस्ट बस तोट्यात असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. उद्धव यांच्या या दाव्यामुळे ओला, उबर सुरू होण्याच्या आधी बेस्ट बस सेवा का तोट्यात होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  'ओला, उबरमुळे ऑटो क्षेत्रातील विक्रीवर परिणाम झाल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या. त्याच ओला, उबरमुळे बेस्टचंही मोठं नुकसान झाल्याचं मला वाटतं,' असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले. बेस्ट सेवा सध्या प्रचंड तोट्यात आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बेस्टनं काही दिवसांपूर्वी तिकीट दरात जवळपास निम्म्यानं कपात केली. प्रवासी संख्या वाढवण्याच्या हेतूनं बेस्टनं तिकीट दर कमी केले. यातून बेस्टचा तोटा कमी होणार का, याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेल.काही दिवसांपूर्वी निर्मला सीतारामन यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ऑटोमोबाईल क्षेत्रातील मरगळीला ओला, उबर जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. तरुणाई नवीन कार घेण्यापेक्षा ओला, उबरनं प्रवास करण्यास पसंती देते. त्याचा परिणाम ऑटो क्षेत्रावर झाल्याचं सीतारामन म्हणाल्या होत्या. 'ऑटोमोबाईल क्षेत्राला बीएस६चा फटका बसला आहे. याशिवाय सध्याच्या तरुणाईचा कार खरेदी करण्याकडे फारसा कल नाही. त्याऐवजी ओला, उबरनं प्रवास करण्यास ते पसंती देतात. त्यामुळे कारच्या विक्रीवर परिणाम झाला आहे,' असं सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेबेस्टनिर्मला सीतारामनओलाउबर