चेंबूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:31 AM2019-08-07T03:31:04+5:302019-08-07T03:31:24+5:30

चेंबूरचा गड कोणाकडे जाणार?; २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही भाजपला मिळाले नव्हते यश

Shiv Sena in Chembur and Churas to get candidacy in Congress | चेंबूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस

चेंबूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस

googlenewsNext

- नितीन जगताप 

मुंबई : चेंबूर या मुंबईच्या मध्यभागी असलेल्या संमिश्र मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत असून, उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

सन २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांनी येथे बाजी मारली होती. हंडोरे यांनी मनसेच्या अनिल चौहान यांचा पराभव केला होता. सलग दोनदा निवडून आल्यानंतर हाच करिश्मा कायम ठेवण्यात त्यांना २०१४मध्ये अपयश आले. एकीकडे काँग्रेस आणि भाजप यांच्याकडेच राहिलेला हा मतदारसंघ मोदी लाट असतानाही भाजपला मिळाला नाही. स्वबळावर लढल्यामुळे काँग्रेसचा हातचा गड गेला.

चेंबूरमधील बलाबल
चेंबूर विधानसभेत महापालिकेचे पाच वार्ड येतात. यामध्ये शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. स्वबळावर लढल्यास भाजप-सेनेची समान ताकद आहे, तर कॉग्रेस त्यांच्या तुलनेत मागे आहे. या मतदारसंघात मराठी टक्का जास्त आहे, दलित मतेही निर्णायक ठरतील इतकी आहेत. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांचे प्रमाणही बºयापैकी आहे.

झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा
यंदाच्या निवडणुकीतही झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. सिद्धार्थ कॉलनी परिसरात कित्येक वर्षांपासून पुनर्वसन होणार असल्याचे गाजर दाखविले गेले, पण अजून त्या कामाला गती नाही. त्यातच विकासकांची भर पडली आहे. काही विकासकांनी वीजबिल भरू नका, आम्ही भरू असे आश्वासन दिले, पण भरले नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून वीजबिल थकले आहे. लाल डोंगर परिसरात काही ठिकाणी पुनर्वसन झाले आहे, तर काही शिल्लक आहे. तशीच परिस्थिती घाटला भागात आहे. पात्र-अपात्रचाही गोंधळ आहे.

प्रदूषणाचे केंद्र माहुल
प्रदूषणामुळे प्रकाशझोतात आलेला माहुल परिसरही याच मतदारसंघात येतो. सध्या तिथे राहत असलेल्या रहिवाशांचे हाल होत आहेत, तर जवळपास असलेल्या कंपन्यांच्या वाहनांमुळे आरसी मार्गावर आणि मेट्रोमुळे सायन पनवेल मार्गावर मोठी वाहतूककोंडी होते़ त्यावर उपाय कधी शोधणार, असा रहिवाशांचा सवाल आहे.

एकीकडे सत्ताधाऱ्यांनी युतीचा प्रस्ताव झुलत ठेवला असताना दुसरीकडे विरोधकांनी आघाडीची मोट बांधायला सुरू केली आहे. त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होईलही, पण त्यासोबतच या भागात वंचितचे आव्हान आहे.
चेंबूर कॉलनी, पीएल लोखंडे मार्ग आदी परिसरात वंचितला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यातच रिपाइंने दीपक निकाळजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचा परिणाम आघाडीच्या मतांवर होईलच.

या मतदारसंघात युती झाली, तर जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे, त्याला तो मतदारसंघ याप्रमाणे चेंबूर शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता आहे. युती नाही झाली, तर मतदारसंघ आपल्याला मिळेल, असे गृहीत धरून उमेदवारीसाठी शिवसेनेकडून स्थानिक आमदारासह दोन जण इच्छुक आहेत. त्यामध्ये उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि नगरसेवक अनिल पाटणकर यांचा समावेश आहे. तर काँग्रेसची आघाडी होणार असली, तरी माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांना दोन स्पर्धक आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्याची बाजी कोण मारते ते पाहणे रंजक ठरणार आहे.

चेंबूर विधानसभा २००९
उमेदवार              पक्ष            मते - लीड
चंद्रकांत हंडोरे   काँग्रेस      ४७४३१-१७९६६
अनिल चौहान     मनसे            २९४६५
अनिल ठाकूर     भाजप           २१७५१

चेंबूर विधानसभा २०१४
उमेदवार                      पक्ष         मते- लीड
प्रकाश फातर्फेकर   शिवसेना  ४७४३७-१००७२
चंद्रकांत हंडोरे          काँग्रेस         ३७३६५
दीपक निकाळजे       रिपाइं         ३६६१५

Web Title: Shiv Sena in Chembur and Churas to get candidacy in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.