Join us  

हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 5:38 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण हा सोहळा पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते.

-  सचिन लुंगसेमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण हा सोहळा पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हवे होते. ते असते तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. त्यांना अपार आनंद झाला असता. त्यांना समाधान लाभले असते. त्यांचे स्थान कायमच शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या हृदयात आहे आणि आजचा क्षण हा सोनेरी अक्षरांत लिहून ठेवण्यासारखा आहे, अशा आनंददायक प्रतिक्रिया शपथविधीला शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.उस्मानाबाद येथील अमोल गवळी आणि त्यांच्यासोबत दाखल झालेले शिवसैनिक म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व लाभले आहे. चंद्रपूर येथील केवल सिंग म्हणाले, राज्यात ‘ठाकरे सरकार’ आले, याचा आनंद आहे. शिवसैनिक असल्याचा अभिमान आहे. कोल्हापूर येथील शिवसैनिक गोविंद वाघमारे म्हणाले, शिवसैनिकांचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्राला शिवसैनिक असलेला मुख्यमंत्री लाभला आहे.कांदिवली येथील शिवसैनिक गोविंद पोळ, बोरीवली येथील दत्ता परुळेकर यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतानाच आनंद व्यक्त केला. पुणे येथून दाखल झालेले मोहन यादव यांनी तर शिवाजी पार्क येथे येत असलेल्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. सजवलेली दुचाकी, त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लावलेली छायाचित्रे, भगव्या रंगात रंगविण्यात आलेल्या या दुचाकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019