Join us

तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम शिवसेना अन काँग्रेसकडून होतंय, फडणवीसांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:06 IST

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांची बाजू घेत शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. 

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून होत आहे. त्यातच, आता शिवसेनेतील वादावर तोडगा काढताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं असून नवीन चिन्ह शिवसेनेच्या दोन्ही गटाला दिलं आहे. त्यावरुन, शिवसेनेतील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरुन, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांची बाजू घेत शिवसेना नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. 

आपली बाजू कमजोर असेल, तेव्हा घटनात्मक संस्थांवर आरोप करण्याची शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत आहे. या संस्था कमजोर करण्याचे प्रयत्न शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. राज्याच्या राजकारणात चांगल्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील दोन्ही गटांत सामना रंगला असून भाजपकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यातच, धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचं नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नेत्यांनी आयोगावर आरोप केले आहेत. त्यासंदर्भात फडणवीस यांनी भूमिका मांडली. 

शिवसेनेने जेवढा वेळ मागितला, तेवढा वेळ आयोगाने दिला. अनेकदा अशी विनंती करण्यात आली होती, पण वेळ काढून कायदेशीर प्रक्रिया टाळता येत नाही. त्याला सामोरे जावेच लागते. आयोगाने हा अंतिम आदेश दिला नसून तो अंतरिम आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, की ते उत्तम आहे, म्हणायचे. पण, मनाविरुद्ध निर्णय दिला की टीका करायची, अशी यांची भूमिका आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, गेल्या काही वर्षांत अन्य राज्यांमध्ये वेगवेगळय़ा पक्षांमध्ये फूट पडली, तेव्हा आयोगाने अशाच पद्धतीने निर्णय दिला आहे. अशी माहिती देत आयोगाविरोधातील रडगाणे राजकीय आहे, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपा