अथर्व शिंदे मृत्यू प्रकरण : पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 08:29 IST2018-07-12T23:49:14+5:302018-07-13T08:29:50+5:30
पोलीस निरिक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले नसले तरी पोलिसांनी याप्रकरणात आणखी एक गुन्हा गुरूवारी दाखल केला.

अथर्व शिंदे मृत्यू प्रकरण : पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा
मुंबई - पोलीस निरिक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले नसले तरी पोलिसांनी याप्रकरणात आणखी एक गुन्हा गुरूवारी दाखल केला. आरे वसाहतीमधील बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे आठ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अथर्व शिंदे याच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त आरे वसाहतीमधील बंगल्यात ७ मे रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अथर्वचा दोन दिवसांनी या बंगल्याच्या जवळच मृतदेह सापडला. आरे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पार्टीत सामील झालेल्या तीस तरूण तरूणींची कसून चौकशी केली. यातून काहीच निष्पन्न न झाल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी न्यायसहाय्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांकडून अर्थवच्या मृत्यूचा अहवालाची मदत घेतली. पार्टीत सामील झालेल्या काहींचे वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाले आहेत. यात आठ जणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघड झाले. या अहवालानुसार आठ जणांविरोधात आरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.