शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदानावरून गोरेगावला, मुंबई महानगर प्रदेशमधीलच शिवसैनिकांना आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:41 IST2025-10-01T11:40:54+5:302025-10-01T11:41:25+5:30
शिंदे सेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडणार आहे.

शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदानावरून गोरेगावला, मुंबई महानगर प्रदेशमधीलच शिवसैनिकांना आमंत्रण
मुंबई : शिंदे सेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडणार आहे. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता मेळाव्यासाठी मुंबई महानगर प्रदेशमधीलच शिवसैनिकांना आमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. लोकांनीच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची शक्ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात येत असून ही मदत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत येण्याऐवजी कार्यकर्त्यांनी ज्या भागात जास्त पाऊस झाला आहे तेथे शेतकऱ्यांना मदत करावी, असे सांगण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.