मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटी रुपयांचे; खा. संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:08 IST2025-12-19T12:08:07+5:302025-12-19T12:08:41+5:30
BMC Election 2026: मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटींचे असून प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केला.

मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटी रुपयांचे; खा. संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाकडून पैशांची उधळपट्टी होणार आहे. मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटींचे असून प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केला.
माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदेसेनेने प्रत्येकी ५ कोटी दिले होते. महापालिकेच्या ठेकेदारांकडून घेतलेले पैसे आता निवडणुकांवर खर्च करत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईत महापौर मनसेचा की उद्धवसेनेचा, हे महत्त्वाचे नसले तरी तो ठाकरे बंधूच्या आघाडीचा व महाराष्ट्राच्या मराठी माणसांचा असेल, असे खा. राऊत यावेळी म्हणाले.
मंत्रिमंडळात पुन्हा घेतील असे वाटत नाही
मंत्रिमंडळातील दोन मंत्री भ्रष्टाचार व गुंडागर्दीच्या आरोपामुळे पदावरून गेले हा फडणवीस सरकारला लागलेला काळीमा आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली असली तरी त्यांना मंत्रिपद मिळेल हे सांगता येत नाही. त्यांच्यावरील आरोप पाहता फडणवीस त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेतील असे वाटत नाही, असे राऊत म्हणाले.
पुढील निवडणुकीपर्यंत शिंदेसेना नसेल
तत्काळ बडतर्फ केले पाहिजे असे अनेक मंत्री शिंदेसेनेत आहेत. काही पैशांच्या बॅगा दाखवत आहेत, काही पैसे मोजत आहेत. फडणवीस त्यांचा टप्प्याटप्प्याने गेम करत आहेत.
पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत शिंदेसेना अस्तित्वात असेल की नाही ही शंका आहे. अजित पवार तात्त्विक विचाराने नाही तर मजबुरी असल्याने स्वतःसह कुटुंबाला वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.