Join us
Daily Top 2Weekly Top 5

'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 11:13 IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे.

मुंबई-

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं याआधीही केली जात होती. यात काही नवी बाब नाही. पण आज चक्क सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून गेल्या दोन दिवसांपासून केल्या जात असलेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यसाठी निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. 

महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दीक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं. 

आमदार भरत गोगावले म्हणाले, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ"महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले. आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते. ते आमच्यावर आंदोलन करून आरोप करत होते. तेव्हा आम्ही बाजुने जात होतो. त्यांना उत्तरही देत नव्हतो. आज आम्ही पहिले तिथे होतो. त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ", असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. 

शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो. - अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे आमदार

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ