Join us

शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार?; भुमरेंच्या दाव्यावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:44 IST

संदीपान भुमरेंच्या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

मुंबई- राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला वाढत चाललेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेतून आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी केला आहे. 

संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. 

भुमरेंच्या या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. पैठणमधील भूमरेंच्या कार्यक्रमाला ५० लोकही नव्हते. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे आधी स्वत:च सांभाळा, अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे.

दरम्यान, भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली. 

टॅग्स :अंबादास दानवेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना