कामगारांसाठी निवारा शेड, ‘ओआरएस’; उष्णतेपासून रक्षणासाठी एमएमआरडीएचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:17 AM2024-04-20T11:17:54+5:302024-04-20T11:19:56+5:30

मुंबई शहर व परिसराला मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत.

shelter shed for workers or mmrda step to protect against heat order to take measures | कामगारांसाठी निवारा शेड, ‘ओआरएस’; उष्णतेपासून रक्षणासाठी एमएमआरडीएचे पाऊल 

कामगारांसाठी निवारा शेड, ‘ओआरएस’; उष्णतेपासून रक्षणासाठी एमएमआरडीएचे पाऊल 

मुंबई :मुंबई शहर व परिसराला मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. त्याचा त्रास कामगारांना होऊ नये, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रकल्पस्थळी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

त्यात कामगारांसाठी निवारा शेड, पिण्याचे थंड पाणी, शरीरातील पाण्याची पातळी घटू नये, यासाठी ‘ओआरएस’चा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एमएमआरडीएकडून मुंबई महानगर मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. मात्र सध्या उष्णतेच्या झळा असह्य करणाऱ्या आहेत. त्याचा कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांना कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.  सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पस्थळी कामगारांची नियमित तपासणी केली जात आहे. 

त्यांना ग्लुकोज वितरण, तसेच नियतकालिक मॉक ड्रील, उष्माघातावर प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर उच्च उष्णतेच्या कालावधीत बांधकाम साइट्सवरील बाहेरील कामकाज टाळण्याचे निर्देशही एमएमआरडीएने कंत्राटदारांना दिले आहे.

उष्माघातासारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता करण्यासही कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

या सुविधा उभारण्यात आल्या-

१) बांधकाम कामगारांना गरज भासेल त्यावेळी विश्रांती घेता यावी, याकरिता बांधकाम स्थळांच्या परिसरात निवारा शेडची उभारणी केली जात आहे.

२) त्याचबरोबर कामगारांना कामादरम्यान काही काळ पुरेशी विश्रांती घेता यावी यासाठी अतिरिक्त वेळ दिला जात आहे.

३) शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ नये, यासाठी ओआरएस वितरण.

४)  पिण्याच्या थंड पाण्याच्या पुरवठा. तसेच पुरेसे पाणी पिण्यासाठी कामगारांना प्रोत्साहन दिले जात आहे.

Web Title: shelter shed for workers or mmrda step to protect against heat order to take measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.