लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. शशांक राव यांनी कामगारांचे हित डोळ्यासमोर न ठेवता कोणी एकत्र आले तरी त्यांना भोपळे मिळणारच, अशी टीका केली. तर ठाकरे ब्रँडची हवा निघाली असून, त्यांची ना ‘पत’ राहिली, ना ‘पेढी’, असा टोला आ. लाड यांनी लगावला. दरम्यान, या निवडणुकीला राजकीय रंग दिला गेला असून, ही लिटमस टेस्ट मानू नये. अजून युद्ध संपलेले नाही, असा इशारा पराभूत झालेल्या उद्धवसेना व मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.
बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीत ८३ टक्के मतदानाचा विक्रम झाला. पावसामुळे वडाळा आगारात मंगळवारी दुपारी दोन वाजता मतमोजणी सुरू झाली. ३५ केंद्र व दीडशे उमेदवारांमुळे मतपत्रिकांच्या मतमोजणीला विलंब झाला. बुधवारी पहाटे निकाल जाहीर झाला. लाड गटाचे ४, शिंदेसेनेच्या किरण पावसकर गटाचे २ व ओबीसी वेल्फेअर युनियनचा एक उमेदवार विजयी झाला. मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीत बॅलेटवर मतदान झाल्याची आठवण उद्धवसेनेला करून देत मराठी माणसाला ठाकरे ब्रँडचे घेणे-देणे नाही. मनसेची ताकद नसताना त्यांनी स्वत:ला बदनाम करून घेतले. राज ठाकरेंना न विचारता हे सगळे केले होते का? असा सवाल केला.
मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राव व लाड यांना स्टार प्रचारक जाहीर करत या दोघांशी निपटून मग आमच्याकडे या, अशी खोचकी टीका केली.
विजयी उमेदवार
मिलिंद आंबेकर, संजय आंब्रे, प्रकाश जाधव, शिवाजी जाधव, शशिकांत अम्मुंडकर, शिवाजी खरमाटे, उज्ज्वल भिसे, मधुसूदन धेंडे, नितीन कोरे, संदीप किरात, भाग्यश्री डोंगरे (महिला राखीव), प्रभाकर धोंगडे (अनुसूचित जाती/ जमाती), किरण चांगण (भटक्या विमुक्त जाती), दत्तात्रय शिंदे (इतर मागासवर्गीय), रामचंद्र बागवे, संतोष बेंद्रे, संतोष चतुर, राजेंद्र गोरे, विजयकुमार कानडे, रोहित केणी, रोहिणी बाईत (महिला राखीव मतदार संघ).
बेस्टमधील १२ हजार कर्मचारी सोबत असूनही प्रचंड पैशांसमोर हरलो. कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीला राजकीय रंग दिला गेला. पतपेढीच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठी यंत्रणा वापरली हे कौतुकास्पद असले, तरी चिंतेची बाब आहे. सुहास सामंत, -अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना
इतकी ताकद लावूनही सहकार समृद्धी पॅनलचे फक्त ७ उमेदवार निवडून आले. त्यामुळे आ. लाड यांनी आत्मपरीक्षण करावे. मनसेने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली. हे युद्ध अजून संपलेले नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. -संदीप देशपांडे, मनसे नेते
आम्ही अशा कोणत्याही निवडणुकीचे राजकीयीकरण करत नाही. कोणीही ते करू नये असेच माझे मत आहे. शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे असले तरी त्यांनीही या निवडणुकीत कसलेही राजकारण आणले नाही. ज्यांनी ते केले, त्यांचे लोकांनी काय केले ते दिसले आहे. लोकांना ठाकरे ब्रॅण्ड वगैरे आवडलेले दिसत नाही, त्यामुळेच त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांना रिजेक्ट केले गेले.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
फेरमतमोजणीची मागणी
बेस्ट सोसायटीची निवडणूक ही कामगार क्षेत्रातील पहिली स्वतंत्र निवडणूक असून पक्षीय पाठिंबा न घेता आम्ही ७ जागांवर विजय मिळवला. ८ जागा अवघ्या ३० ते ४० मतांच्या फरकाने निसटल्या असून कमी फरकाने पराभूत झालेल्या जागांसाठी फेरमतमोजणी करण्याची मागणी आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.