शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 07:18 IST2025-12-18T07:17:56+5:302025-12-18T07:18:28+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला.

शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. यात मुंबईतील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून मुंबईत मनसे-उद्धवसेनेसोबत निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
२०१७च्या निवडणुकीत मुंबईतून एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. मुंबईच्या पूर्व उपनगरात राष्ट्रवादीची थोडी ताकद असून, किमान २५ ते ३० नगरसेवक निवडून आणण्याचा शरद पवार गटाचे ध्येय असल्याचे समजते.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात शशिकांत शिंदे आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीती, संघटनात्मक मजबुती व जनतेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मुंबईत युती करण्याबाबत काँग्रेसकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र, पक्षातील नेत्यांचा कल हा उद्धवसेना-मनसेसोबत जाण्याकडे आहे, असे पक्षाचे मुंबई युथ विंगचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी सांगितले. पक्षाकडून किमान ५० जागांची मागणी होऊ शकते. मात्र, त्यात कमी-अधिक होऊ शकते. लोकसभेप्रमाणे कमी जागा लढून जास्तीत जास्त स्ट्राइक रेट ठेवण्याचा पक्षाचा मानस आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसंग्राम उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
१. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व भिवंडी महापालिकांची निवडणूक लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसंग्राम लढवणार आहे. अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रवक्ते योगेश विचारे यांनी दिली.
२. नगरपालिकेपाठोपाठ होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी डॉ. मेटे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली.
३. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी येथील शिवसंग्रामचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागातील जागा लढवण्याबाबत बैठकीत विचार करण्यात आला, असेही विचारे यांनी सांगितले.