Join us  

शरद पवारांच्या हत्येचा कट, सायबर पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 4:44 PM

निवडणुकांच्या काळात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय तेढ

पुणे/ मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हत्येचा कट केला जात असल्याची तक्रार पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गोपनीय तातडीची तक्रार म्हणून लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया यांनी आजच ही तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावरील मेसेजेसचा संदर्भ त्यांनी दिला आहे. 

निवडणुकांच्या काळात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करून सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जाईल, असे कृत्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर, घनशाम पाटील आणि इतर लोकांकडून युट्यूबवर (postman, thinktank etc) या चॅनेलच्या माध्यमातून शरद पवार यांना संपविले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशा आशयाची भाषणे होत आहेत. हे चिथावणीखोर वक्तव्ये माझ्या निदर्शनास आल्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचं खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. खाबिया हे पुण्यातील शिवाजी नगर भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, पुणे सायबर पोलीस विभागाने त्यांच्या तक्रारीची नोंद करुन घेतली आहे. 

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या युट्युब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोरेगाव भिमा दंगलीचे खरे सुत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करत, हे प्रकरण गंभीर असल्याचंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :शरद पवारखूनराष्ट्रवादी काँग्रेसपुणेपोलिससायबर क्राइम