शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण..., मनसेसोबत आघाडीबाबत हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:44 IST2025-11-22T19:44:17+5:302025-11-22T19:44:40+5:30
Mumbai Municipal Corporation Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी मुंबईत एकत्र लढण्याचा सल्ला काँग्रेसला दिला होता. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर दिलं आहे.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण..., मनसेसोबत आघाडीबाबत हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
राज्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष आपापल्यापरीने मोर्चेबांधणी करत आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाने मुंबईवरील आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मनसेसोबत युती करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही काँग्रेस स्वबळावर लढावे, अशी घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी मुंबईत एकत्र लढण्याचा सल्ला काँग्रेसला दिला होता. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर दिलं आहे.
एकत्र येऊन सत्याचा मोर्चा काढू शकता, मग निवडणूक लढवण्यास काय हरकत आहे, असे शरद पवार म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आघाडीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे पण मुंबईत कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय मुंबई काँग्रेस घेईल.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत आघाडी करण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस. हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे, साठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा!” अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेण्यावरून येत्या काही दिवसात महाविकास आघाडीमधील मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे.
तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे असा आरोप करणाऱ्या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरू असून, त्यांनी लोकशाहीला काळीमा फासला आहे. महायुतीच्या या गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि विकृत राजकारणाला मुठमाती द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
पुढे बोगस मतदार यादीसंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपाच्या हाताखालचे बाहुले बनले आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असतात ते पुराव्यासह राहुल गांधी यांनी उघड केले आहे. राज्य निवडणूक आयोगालाही मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली पण निवडणूक आयोगाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले चिंताजनक आहे.