Join us

'पवारांनीच माझं बोट धरलंय', 'त्या' प्रश्नावर राज ठाकरेंच सूचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 11:31 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मोदीविरोधी भूमिकेमुळे आणि शरद पवार यांच्याशी वाढलेल्या जवळीकतेमुळं त्यांची राष्ट्रवादीशी युती होईल का?

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील सभांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या सभांमध्ये व्हीडिओच्या माध्यमातून मोदींच्या भाषणाच्या क्लिप दाखवून मोदींना त्यांच्या कामाची आणि जुन्या आश्वासनांची आठवण राज ठाकरे करुन देत आहेत. त्यातच, पवारांशी वाढलेल्या जवळीकतेमुळे, राज ठाकरेही पवारांचे बोट धरून पुढे येणार का? या प्रश्नावर मी नाही, त्यांनीच माझं बोट धरलंय असे राज ठाकरेंनी म्हटलं. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मोदीविरोधी भूमिकेमुळे आणि शरद पवार यांच्याशी वाढलेल्या जवळीकतेमुळं त्यांची राष्ट्रवादीशी युती होईल का? असा प्रश्न आज तक या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर, राज यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर भाषणांमधून पवारांच बोट धरूनच मी राजकारणात आसल्याचं सांगतात, याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजपाची आघाडी होणार, असं थोडीच आहे. राजकारणापलिकडेही आमचे संबंध असतात, एकमेकांकडे येणं जाणं असतंच, याचा अर्थ आघाडी किंवा युतीच असे नाही. त्यामुळे सध्या तरी माझा फोकस हा लोकसभा निवडणुकांवर आहे. विधानसभा निवडणुकांवेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल, त्यावेळी मी माझ्या पक्षांचे आणि संघटनांची रणनिती तुम्हाला सांगेल असे राज ठाकरेंनी म्हटले. 

दरम्यान, या मुलाखतीवेळी आपलं पवारांशी कुठलंही राजकीय नातं नसल्याचंही राज यांनी स्पष्ट केलं. तसेच, मोदींनी पवारांचे बोट धरुन राजकारणात प्रवेश केला. पण, तुम्ही जर तो फोटो नीट पाहाल, त्यांनीच माझं बोट धरलंय, असे उत्तर राज ठाकरेंनी दिलं. यावेळी, पत्रकारासह राज यांच्याही चेहऱ्यावर स्मीतहास्य उमटले होते. दरम्यान पुणे येथील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी खासदार शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी, राज यांनी पवारांचा हात धरलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरुनच राज ठाकरे पवारांसोबत एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या होत्या.    

टॅग्स :राज ठाकरेमनसेशरद पवारलोकसभामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019