Join us

खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याची वेळ आणली, पण...; शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:35 IST

आज पोलिसांचा वापर पत्रकारांच्या घरांवर धाडी टाकण्यासाठी होतं. दिल्लीत केजरीवालांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर सुरू आहे असं शरद पवार म्हणाले.

मुंबई - कधीकाळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या वेगळ्या अध्यक्षाची निवड केली आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही ज्यांची निवड केली आहे ते तुरुंगात कधी गेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहित नाही तुम्हाला तो सगळा इतिहास माहिती आहे. आज पक्षाची ही बैठक आत्मविश्वास वाढवणारी आहे. आज आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा वेळ आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांनी आणली पण सामान्य माणसाच्या अंत:करणात वसलेल्या खऱ्या राष्ट्रवादीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.  मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आपलं म्हणणं हे सत्यावर आधारित आहे हे लोकांच्या समोर येईल याची मला खात्री आहे. आज आपल्याला काम करताना एका बाजूला संघर्ष व दुसऱ्या बाजूला आपली सामान्य लोकांशी बांधिलकी आहे. आज सबंध देशामध्ये कुणी काही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जे जाऊ इच्छितात लोक त्यांच्या बरोबर नाही हे चित्र आहे. दिवसेंदिवस देशामध्ये भाजप कमी होत आहे हे चित्र दिसतंय त्याचं कारण असं की सत्तेचा गैरवापर. सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. आज जे निर्णय घेतले जातात ते सगळे निर्णय सामान्य माणसाला शक्ती देणारी नाही असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत कायमस्वरूपी नोकरीची सामान्य माणसाची अपेक्षा असते मात्र कंत्राटी भरतीचा शासनाने निर्णय घेतला आहे. पोलीस देखील कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत, मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीही असं ऐकलेलं नाही. पोलिसांना कंत्राटी पद्धतीने घेणं याइतकं चुकीचं काम कोणत्याही सरकारने आजवर केलेलं नाही ते भाजपा सरकारने केलं आहे. हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आज आपल्याला असे निर्णय घेणारे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे. घातक निर्णय घेणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता ठेवणे हे योग्य नाही असं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, आज पोलिसांचा वापर पत्रकारांच्या घरांवर धाडी टाकण्यासाठी होतं. दिल्लीत केजरीवालांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर सुरू आहे. एखादा पक्ष जर असं काम करत असेल तर त्याच्याविरुद्ध एक सामूहिक शक्ती उभी केली पाहिजे. ती शक्ती उभी करण्याचं काम आपल्या पक्षाने आणि आमच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. आम्ही 'इंडिया' आघाडी उभी केली आहे. आपण सर्वजण मिळून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरुद्ध जागृती करून त्यांच्या हातून सत्ता काढून घेऊ आणि सामान्य माणसाच्या हातात सत्ता देऊ आणि देशाचे समाजकारण, राजकारण कसं सुधारेल? याची काळजी आपण घेऊ. हे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचा कार्यकर्ता अखंडपणाने काम करेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार