Join us

कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 06:16 IST

मराठवाडा आणि दुष्काळी भागाचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : मराठवाडा आणि आणखी काही दुष्काळग्रस्त भागाचे चित्र शक्तिपीठ महामार्गामुळे बदलेल. आज जे विरोध करत आहेत त्यांनी समृद्धी महामार्गालाही विरोध केला होता, पण हाच मार्ग आज गेमचेंजर ठरत आहे. वित्तीय दायित्व याबाबत मते मांडणे ही वित्त विभागाची जबाबदारीच आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ मार्गाचे जोरदार समर्थन केले. 

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठवाडा आणि दुष्काळी भागाचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे. या महामार्गावर प्रत्येक १०० किलोमीटरमागे पाचशे ते एक हजार शेततळी बांधली जाणार आहेत. या महामार्गावर जेथे नाले आहेत तिथे बंधारे बांधून पाणी अडवणार आहोत. त्यामुळे दुष्काळी भागात जलसंवर्धन आणि जलपुनर्भरण होणार आहे. हरित ऊर्जादेखील मोठ्या प्रमाणात तयार होईल. हा केवळ महामार्ग नाही तर एकात्मिक विकास त्यातून साधला जाणार आहे. 

कुरघोडी कसली? : आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच

शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्ताने वित्त विभागाने घेतलेल्या आक्षेपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार कुरघोडी करीत असल्याच्या बातम्यांकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, कुरघोडी कसली? कोणताही प्रकल्प आला तर त्याद्वारे येणारा वित्तीय भार, कर्ज किती घेतले जाणार, त्यासाठीचे वित्तीय दायित्व याबाबत मते मांडणे ही वित्त विभागाची जबाबदारीच आहे.दायित्व वाढणार असले तरी त्यातून मिळणारा परतावा सकारात्मक असेल तर राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. 

अगोदर ‘शक्तिपीठ’ मार्ग समजून घेणार : शरद पवार

सातारा: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प काय आहे ते अगोदर समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? तसेच राज्य शासनानेही याबाबत माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विरोधासाठी विरोध नको. याबाबत सर्व समजून घेतल्यानंतरच मी याविषयावर बोलेन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी  आपले मत  व्यक्त केले.

लाइन बदलून शक्तिपीठ होणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे तो होणारच, कोल्हापुरातून शक्तिपीठ महामार्ग कसा नेता येईल यासाठी राज्य रस्ते महामंडळाने चार पर्याय दिले आहेत. यावर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल परंतु जिथे विरोध होईल तिथे लाइन कशी बदलून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशक्तिपीठ महामार्गमहाराष्ट्र सरकारमहायुती