लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचविण्यासाठी त्याचे वडील शाहरूख खान यांच्याकडून कधीही लाच मागितली नाही किंवा घेतलीही नाही, अशी माहिती एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दिली.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानला सोडविण्यासाठी शाहरुख खान यांच्याकडून लाच मागितल्याचा सीबीआयचा आरोप आहे. याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
समीर वानखेडे यांचा युक्तिवाद काय?
आर्यनला क्लीन चिट देण्यासाठी वानखेडे यांनी शाहरूखकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मात्र, ते सिद्ध करण्यासाठी सीबीआयकडे ठोस पुरावे नाहीत. कॉर्डेलिया क्रुझवर ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कायद्याच्या चौकटीत तपास करण्यात आला होता आणि काही व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यात आर्यन खानचाही समावेश आहे, असा युक्तिवाद वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला. न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली.
एनसीबीने दिली हाेती आर्यनला क्लीन चिट
सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरोधात भादंवि कलम १२०-ब (गुन्हेगारी कट), कलम ३८८ (खंडणीसाठी धमकी) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार एनसीबीकडून करण्यात आली होती. आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डेलिया क्रूझवरील कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणात १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मात्र, आर्यनला क्लीन चिट दिली.
एनसीबी अधिकाऱ्यांसह काही व्यक्तींनी आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती, असा दावा एका स्वतंत्र साक्षीदाराने २०२१ मध्ये केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. यानंतर एनसीबीने वानखेडे आणि इतरांविरोधात चौकशी केली आणि त्याचा अहवाल सीबीआयकडे दिला. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Web Summary : Sameer Wankhede informed the High Court he never demanded or accepted a bribe from Shah Rukh Khan to acquit Aryan in drugs case. CBI alleges Wankhede sought a bribe; the court has scheduled further hearings.
Web Summary : समीर वानखेड़े ने उच्च न्यायालय को बताया कि उन्होंने आर्यन को ड्रग्स मामले से छुड़ाने के लिए शाहरुख खान से कभी रिश्वत नहीं मांगी या ली। सीबीआई का आरोप है कि वानखेड़े ने रिश्वत मांगी; अदालत ने आगे की सुनवाई तय की है।