मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 07:36 IST2025-07-02T07:35:24+5:302025-07-02T07:36:10+5:30
या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हेदेखील तपासू. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा मिळेल.

मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
मुंबई : बीड येथील कोचिंग क्लासमध्ये झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हेदेखील तपासू. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा मिळेल. त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी हे प्रकरण सभागृहात उपस्थित केले. २६ जून रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
पवार, खाटोकरच्या कोठडीत वाढ
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आधी दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर तपास अधिकारी बदलले. मंगळवारी त्यांना पुन्हा हजर केले. बीडमधील न्यायालयाने दोघांनाही ५ जुलैपर्यंत वाढीव कोठडी दिली आहे.
‘कोणाचा वरदहस्त आहे का याचीही तपासणी करू’
मुख्यमंत्री म्हणाले की, बीडमध्ये घडलेली ही अतिशय गंभीर घटना आहे. पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती अधिक असू शकते, अशी शक्यता बोलली जाते आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमून चौकशी करू. यात कोणाचा वरदहस्त आहे का हे तपासू. कालबद्ध स्वरूपात एसआयटी तपास करेल. नराधमांना कठोर शिक्षा मिळेल.