नऊपैकी सात रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता नाही! मुंबईकरांना तूर्तास दिलासा; दोन रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 11:25 IST2021-12-04T11:25:14+5:302021-12-04T11:25:55+5:30
Coronavirus in Mumbai: ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या नऊपैकी सात जणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे.

नऊपैकी सात रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता नाही! मुंबईकरांना तूर्तास दिलासा; दोन रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत
मुंबई : ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या नऊपैकी सात जणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे. मुंबईला दिलासा मिळाला आहे. उर्वरित दोन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
ओमायक्रॉन संक्रमित ४० देशांतून मागील महिन्याभरात २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी केल्यानंतर नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये आठ मुंबईचे तर एक डोंबिवलीचा रहिवासी आहे. त्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल मिळण्यास विलंब असल्याने सद्य:स्थितीत ‘एस-जिन’ चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सात रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सर्व १६ रुग्णांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली आहे.
कोरोनाबाधित आढळलेल्या नऊ प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एखाद्या उच्चभ्रू रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्यास बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयातही बाधित प्रवाशांसाठी खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काही नमुने पुण्याला रवाना
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग चाचणीची यंत्रणा आहे. मात्र या ठिकाणी एकावेळी २८८ नमुने ठेवावे लागतात. त्यामुळे तातडीने अहवाल मिळावेत यासाठी सर्व १६ बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच ओमायक्राॅनबाबतच्या सूचना जाहीर होण्याआधी मुंबईत आल्यानंतर कोरोनाबाधित ठरलेल्या प्रवाशांचा शोधही पालिका घेत आहे. यामध्ये सात प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन संक्रमित देशातून आलेले एकूण १६ प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत.