फक्त ६०० रुपयांच्या वादातून अॅसिडहल्ला; ७ जण होरपळले, ३ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:44 IST2026-04-03T10:44:37+5:302026-04-03T10:44:37+5:30
मालाडमधील घटना

फक्त ६०० रुपयांच्या वादातून अॅसिडहल्ला; ७ जण होरपळले, ३ अटकेत
मुंबई : ६०० रुपयांच्या वादातून केलेल्या अॅसिडहल्ल्यात ७ जण होरपळले. ही धक्कादायक घटना मालाडमधील कुरार गावात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी समरबहाद्दर सिंग (३८) याच्यासह हेमंत राठोड (२०), नितीन धोबी (२४) यांना अटक केली आहे.
कुरार गावातील रहिवासी समरबहाद्दर सिंग याचे दागिने पॉलिश करण्याचे दुकान असून, शेजारीच मयूर कानोजिया (२०) याचे दागिने बनविण्याची युनिट आहे. दोघांमध्ये नेहमी व्यावसायिक व्यवहार होत असत. एका व्यवहारात कानोजियाने चुकून २६ हजार ४०० रुपयांऐवजी २७ हजार रुपये सिंगला दिले. त्याने जास्त दिलेले ६०० रुपये सिंगकडे परत मागितले. कानोजियांच्या वडिलांनी सिंगच्या दुकानात जाऊनही उर्वरित रकमेची मागणी केली; परंतु, सिंगने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेला कानोजिया त्याच्या ७ ते ८ मित्र-नातेवाइकांसह सिंगच्या दुकानात आला. त्यांच्यात पैशांवरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी सिंगने पाण्यात मिसळलेले पॉलिशिंगसाठी वापरले जाणारे अॅसिड त्या गटावर फेकले.
सर्व जखमींना कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला असून, पाच जणांना ऑब्झर्वेशनसाठी ठेवल्याची माहिती कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.