"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:26 IST2025-03-24T09:22:42+5:302025-03-24T09:26:08+5:30

कुणाल कामरा याने संविधानाची प्रत हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Set vandalized after criticism of eknath Shinde comedian Kunal Kamra first reaction showing a copy of the Constitution | "आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

Kunal Kamra Vs Shiv Sena: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत गद्दारीसह अन्य शब्दांचा वापर केल्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आणि कामरा याचा कॉमेडी शो जिथं पार पडला होता त्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. तसंच शिवसेना नेत्यांकडून कुणाल कामराला आक्रमक इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कामरा याने संविधानाची प्रत हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर संविधानाची प्रत असलेला फोटो शेअर करत कुणालने म्हटलंय की, "आता फक्त हाच मार्ग उरला आहे." शिंदेसेनेच्या तोडफोडीच्या भूमिकेला आपण कायदेशीर मार्गाने आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून प्रतिकार करणार असल्याचं त्याने या पोस्टमधून सुचवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

राहुल कनाल यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल

कुणाल कामराच्या शोनंतर खार येथील सेटची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी युवासेना महासचिव राहुल कनाल यांच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीएनएस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुणाल कामराचा फोन बंद

एकनाथ शिंदेंवरील गाण्याने वादंग निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून कुणाल कामरा याचा फोन बंद आहे. युवासेनेच्या राहुल कनाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कामरा याचा शोध सुरू असल्याचे समजते.

Web Title: Set vandalized after criticism of eknath Shinde comedian Kunal Kamra first reaction showing a copy of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.