ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 07:03 AM2023-12-27T07:03:21+5:302023-12-27T07:04:16+5:30

गोरेगावमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

senior sculptor painter dr uttam pacharne passed away | ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन

ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्येष्ठ शिल्पकार व ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम रोहिदास पाचारणे उर्फ आण्णा (६७) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. मेंदूतील रक्तस्रावामुळे ते कोमात गेले होते. गोरेगावमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

गोरेगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री राम नाईक, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुळकर, रवी मंडलिक, मारुती शेळके, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव चंद्रजीत यादव, जहांगीर आर्ट गॅलरीचे कार्यकारिणी सदस्य  तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक तसेच कला क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते.

आमचा मित्र जग सोडून गेला, आम्हीही जाऊ, सरकार लक्ष कधी देणार? 

सुहास बहुळकर, ख्यातनाम चित्रकार 

ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात व्हावे, असे स्वप्न कायम पाहणारे त्याच्या पूर्ततेसाठी धडपड करणारे आमचे मित्र उत्तम पाचारणे यांचे ते स्वप्न प्रत्यक्षात न येताच, ते हे जग कायमचे सोडून गेले. सर्जनशील शिल्पकार, निरलसपणे कार्यकर्ता आणि संघटक ही त्यांची ओळख. 

अहमदनगर जिल्ह्यातील चखालेवाडी या छोट्याशा गावी जन्मलेल्या आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत बालपण गेलेल्या पाचारणे यांनी कष्टाने, पुण्याच्या अभिनव कला विद्यालय आणि मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कला शिक्षण पूर्ण केले. पाचारणे यांना केंद्र सरकारचा ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही तरुण वयातच मिळाला.

दृश्यकलेच्या संदर्भात कमालीचे दुर्लक्ष करण्यात आणि चित्र-शिल्पकारांना सोयीसुविधा आणि प्रोत्साहन देण्यात सरकार कायमच आखडता हात घेणारेच का येते, असा प्रश्न त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा विचारावा वाटतो. महाराष्ट्रात ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र व्हावे यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू होते. गेली काही वर्षे मी व माझ्यासोबत उत्तम पाचारणे, वासुदेव कामत अशी अनेक मंडळी त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सरकार कोणाचेही असले तरी दिल्लीतून ललित कला अकादमीच्या विभागीय केंद्रासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात कसा येणार नाही, असाच प्रयत्न करत असल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत.

पाचारणे हे जग सोडून गेले. ललित कला अकादमीचे केंद्र महाराष्ट्रात हाेण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ शिल्पकार हे जग केव्हाच सोडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज आमचा मित्र हे जग सोडून गेला, उद्या आम्हीही हे जग सोडून गेलो तरी दृश्यकलेच्या बाबतीत या आधीचे आणि विद्यमान सरकार असेच वागणार आहे का? त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची सद्बुद्धी शासनाला मिळावी, ही प्रार्थना!

भारतातील कलाकारांशी मैत्री ठेवणारा ‘देवा’ म्हणणारा मित्र गेला

वासुदेव कामत, ज्येष्ठ चित्रकार 

एखादे पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा- पुन्हा  मागची पाने वाचावीशी वाटतात, तसे उत्तमच्या जाण्याने जुन्या गोष्टी आणि आमच्या गाढ मैत्रीचे प्रसंग पाने उलटावी तसे आठवू लागले.

नक्की साल आठवत नाही, परंतु १९८५-८६ च्या आसपास बाेरीवलीच्या दत्तपाड्याच्या रस्त्यावर आमची पहिली भेट झाली. नावानेच हाक मारून माझ्या खांद्यावर हात ठेवीत उत्तम म्हणाला, ‘देवा, (या नावाने फारच कमी मला हाक मारतात) फार घाईत आहेस का?’ म्हटले, ‘मी ओळखले नाही!’ नाही तसा आपला परिचय नाही, पण मी तुला ओळखतो.’ माझे नाव उत्तम पाचारणे, माझे फाउंडेशन पुण्याला झाले, पण जे. जे.च्या शेवटच्या वर्षी सुवर्णपदक मिळालेले पेंटिंग, बाॅम्बे आर्ट साेसायटीचे सुवर्णपदकाचे पाेर्टेट, ‘माय वाईफ’ आणि इतरही पाहिलेली माझी पेंटिंग तो सांगत होता. मी मात्र लाजेने चूर झालाे होतो. कारण, मला स्वतःला त्यावेळी इतरांची कलाकृती इतक्या तपशीलाने आठवत नव्हती. तिथेच एका हाॅटेलात बसून दुधी हलवा खाल्ला आणि फिल्टर कॉफी घेऊन मैत्री दृढ झाली. हा पहिल्या भेटीचा प्रसंग इतका घट्ट मैत्रीने बांधला गेला तो कधीही अंतरला नाही. १९८९ मध्ये माझे दिल्लीला प्रदर्शन होते. मी प्रथमच दिल्लीला जात होतो.  त्यावेळी पाठच्या भावाप्रमाणे उत्तम माझ्याबरोबर दिल्लीला आला, त्याने माझी अनेकांशी ओळख करून दिली. ललित कला अकादमीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. चित्रकार सी. एम. परदेशी सरांशी परिचय करून दिला. या सर्व गोष्टीतून मला एक लक्षात आले की, उत्तम केवळ शिल्पनिर्मिती करणारा कलाकार नाही, तर भारतातील सर्व प्रांतातील कला विश्वाशी, कलाकारांशी मैत्रीसंबंध ठेवणारा सन्मित्र होता.

पुढे ‘द बॉम्बे आर्ट’ सोसायटीच्या चेअरमनपदी ताे सतत कार्यरत होता. अनेक पुतळे, उठाव शिल्पे, तसेच स्वान्तसुखाय केलेल्या कलाकृती त्याच्या कर्तृत्वाची गाथा सांगणाऱ्या आहेत. अगदी तरुण वयात ललित कलेचा पुरस्कार मिळविणारा शिल्पकार आपल्या कामाने ‘डी लिट’ पदवी प्राप्त पुरस्काराने सन्मानित झाला हाेता.

कलानिर्मितीबरोबर कला क्षेत्रातील सर्वांच्या हिताची बांधिलकी ठेवणारा कलाकार म्हणून त्याचे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व हाेते. आज मात्र आम्ही त्याच्या आधाराला मुकलाे, असे जाणवते आहे. त्याला सद्गती लाभाे आणि त्याची पत्नी, मुलगा सुबोध व कन्या सुरूची यांना धैर्य मिळो, ही प्रार्थना. शेवटी एक सांत्वन करण्याची आमची क्षमता नाही, की उत्तमचे पिताश्री ज्यांना हे पुत्रवियोगाचे दुःख झेलावे लागत आहे.

दिल्लीच्या ललित कला अकादमीचे रिजनल सेंटर व्हावे म्हणून त्याने केलेल्या मेहनतीला ताेड नाही. परंतु, आपल्या शासनाच्या उदासीनतेमुळे हे पूर्ण होणारे स्वप्न उत्तमच्या हयातीत त्याला पाहता आले नाही, हे आम्हा कलाकारांचे चिघळणारे दुःख आहे. 
 

Web Title: senior sculptor painter dr uttam pacharne passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई