ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:11 AM2019-12-29T03:11:10+5:302019-12-29T03:11:30+5:30

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ रेषा आणि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी निधन झाले.

Senior satirist Vikas Sabnis merges with Anant | ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस अनंतात विलीन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस अनंतात विलीन

Next

मुंबई : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ रेषा आणि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, सबनीस यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० रोजी झाला. त्यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते. पुढे नोकरी करणे नाकारून स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम सुरू केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते. बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यावर ‘मार्मिक’ची जबाबदारी त्यांनी सबनीस यांना दिली. तेथे त्यांनी १२ वर्षे काम केले. त्यानंतर अनेक दैनिकांत व्यंगचित्रकार म्हणून काम केले.

सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीला यंदाच ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त २० फेब्रुवारीला शिवाजी पार्क, सावरकर सभागृहात आयोजित ‘रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची’ या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांचे ‘व्यंगनगरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

निष्ठावंत कला उपासक हरपला - मुख्यमंत्री
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून, संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा दूर गेल्याचे दु:ख मनात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सबनीस यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य केले. ‘मार्मिक’शी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. व्यंगचित्रामागे असलेला विचार ही त्यांची विशेष ओळख होती. रेषांच्या साहाय्याने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परिणामांचा विचार त्या व्यंगचित्रामागे असे. स्व. बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण अशा महान व्यंगचित्रकारांकडून प्रेरणा घेऊन या दोघांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या निधनाने ५० वर्षे कलेची सेवा करणारा निष्ठावंत कला उपासक हरपला आहे.

सबनीस यांची उणीव भासेल - राज ठाकरे
‘माझे मित्र, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन झाले. विकास यांनी आयुष्याची ५० वर्षे व्यंगचित्रकलेला वाहिली. व्यंगचित्रकाराच्या कुंचल्याला रोज आव्हान देणारे राजकीय वातावरण असताना सबनीसांची उणीव नक्कीच भासेल. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन’ असा संदेश सबनीस यांच्या फोटोसह फेसबुकवर शेअर केला आहे.

सातासमुद्रापलीकडेही गौरव
विकास सबनीस यांनी रेखाटलेली आंतरराष्ट्रीय विषयावरील काही राजकीय व्यंगचित्रे अमेरिका, जर्मनीमध्येही प्रसिद्ध झाली आहेत. यानिमित्त सबनीस यांचा जागतिक कीर्तीचे अमेरिकन व्यंगचित्रकार रॅनन ल्युरी यांनी गौरव केला. ‘गोष्टी व्यंगचित्रकारांच्या’ या व्यंगचित्रावर आधारित एकपात्री कार्यक्रमाचे सबनीस यांनी देशविदेशांत शेकडो प्रयोग केले. युरोपच्या दौºयाचे सचित्र व रसभरीत वर्णन असलेल्या ‘युरोप आय लव्ह यू’ या त्यांच्या पुस्तकालाही वाचकाचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांनी दिला इंग्रजीत ब्रेक
मराठीतल्या अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांसाठी आणि दैनिकांसाठी सबनीस यांनी व्यंगचित्रे काढली. तसेच त्यांनी ‘मिड डे’, ‘आफ्टरनून’ या इंग्रजी दैनिकांसाठीही व्यंगचित्रे काढली. तीही खूप गाजली. पण त्यांना इंग्रजीत पहिला बे्रक बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांनी दिला. १९८२ साली सबनीस यांचे पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले ते ‘मिड डे’ या दैनिकात. त्या वेळी बिझी बी बेहराम कॉन्ट्रॅक्टर मिड डेत संपादकीय विभागात काम करत. त्यांनी आग्रह केला म्हणून सबनीस यांनी इंग्रजी दैनिकासाठी पहिलेवहिले व्यंगचित्र रेखाटले. त्यामुळे ते इंग्रजी वाचकांमध्ये परिचित झाले. पुढे कॉन्ट्रॅक्टर आणि सबनीस यांचे ऋणानुबंध कायमचे राहिले. कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यानंतर ‘आफ्टरनून’ पेपर सुरू केला. आफ्टरनूनचे व्यंगचित्रकार होते अर्थातच विकास सबनीस. त्यामुळे सबनीस नेहमीच कॉन्ट्रॅक्टर यांच्याविषयी आदरपूर्वक बोलत. एका कलावंताने एका संपादकाला दिलेली ती एक दाद होती.

Web Title: Senior satirist Vikas Sabnis merges with Anant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.