ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:12 PM2020-01-06T23:12:52+5:302020-01-06T23:13:00+5:30

ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

Senior painter Akbar Padmasi passes away | ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

Next

मुंबई : ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. चित्रकलेच्या विश्वात स्वत:ची वेगळी ओळख पदमसी यांनी निर्माण केली होती. पदमसी यांनी चित्र-शिल्प, चित्रपटनिर्मिती, छायाचित्रण, एन्ग्रेव्हिंग, लिथोग्रफी, तसेच संगणक चित्रे अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी केली. त्यांची विचारवंत, प्रयोगशील कलाकार अशी ओळख होती.

आधुनिक आणि उत्तर आधुनिक भारतीय चित्रकारांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार अकबर पदमसी यांचा जन्म मुंबई येथे १९२८ मध्ये झाला होता. त्यांनी कलेचे शिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स संस्थेतून १९५१मध्ये शिक्षण पूर्ण केले. कलाशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच १९५२मध्ये त्यांची पॅरिसमध्ये दोन समूह-प्रदर्शने झाली. त्यांत त्यांच्याबरोबर रझा व सुझा हे चित्रकार होते. त्याच वर्षी त्यांच्या ‘वुमन विथ द बर्ड’ या चित्राला ‘जर्नेल-डी. आर्ट’ हा फ्रान्समधील पुरस्कार मिळाला, तर १९५३ मध्ये इंटरनॅशनल बिनाले, पॅरिस या प्रदर्शनात चित्र मांडण्याचा मान मिळाला. पुढील कारकीर्दीत त्यांना असे अनेक पुरस्कार मिळाले. रंगभूमी कलाकार अ‍ॅलेक पदमसी यांचे ते बंधू होते.

मानवाकृती, दैनंदिन जीवनातील साध्या वस्तू व निसर्ग अशा गोष्टींवर त्यांची चित्रे आधारित होती. त्यात त्यांचा पारंपरिक अर्थाने प्रतिमांचा वापर करणे एवढाच उद्देश नव्हता, तर  त्यात व्यक्तिगत आशयही असायचा. पदमसींची १९५८-६० दरम्यानची चित्रे केवळ कृष्ण-धवल रंगात आहेत. अकबर पदमसी हे अनेक कलासंघटनांच्या समित्यांवर आहेत. त्यांपैकी भारतीय कला भवन, भोपाळ यासाठी कलाकृती संग्रहित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना ‘कालिदास सन्मान’, मध्यप्रदेश, (१९९७-९८), ‘ललित कला रत्न’ (२००४), ‘दयावती मोदी’ अवॉर्ड (२००७), ‘रूपधर’ बॉम्बे आर्ट सोसायटी, (२००८), ‘पद्मभूषण’ (२०१०) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Senior painter Akbar Padmasi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.