Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 14:11 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई- राज्यात बुधावारी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या १२ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. राज्य सरकारच्या या गोंधळावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा कराव्या याबाबत काही नियम तयार केले आहे. बदली हा पोलीस महासंचालकाचा अधिकार आहे, मंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  

एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या बदल्या करतात, त्या कोणत्या आमदाराला विचारून करतात. चांगले पोलीस अधिकारी आले तर आपण अडचणीत येऊ, अशा भावनेतुन जर या बदल्या होत असेल आणि गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी हे गृहमंत्री पद फेकून द्यावं, असा खोचक सल्ला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वलसे-पाटील यांना दिला आहे.

राज्याच्या पोलीस पदोन्नतीचा आदेश जारी होऊन अवघे १२ तासही झालेले नसताना गृहखात्यातून काल रात्री जारी केलेले आदेश तातडीनं स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. स्थगितीच्या आदेशामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण पोलीस बदली आणि पदोन्नतीचा आदेश जारी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीच्या आदेशावर स्थगिती देण्याची वेळ गृहखात्यावर का आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. यात एकूण पाच पोलिसांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे. राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नतील पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसंच पत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून जारी करण्यात आलं आहे. पोलीस बदलीचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारदिलीप वळसे पाटीलभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी