"तू गोरी दिसतेस, ऑनलाइन ये, उद्या भेटू"; माजी नगरसेविकेला रात्री पाठवले मेसेज, कोर्टाने दिली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:26 IST2025-02-22T13:24:47+5:302025-02-22T13:26:12+5:30

माजी नगरसेविकेला रात्री मेसेज करणाऱ्या आरोपीची शिक्षा कोर्टाने कायम ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

Sending WhatsApp messages to a woman at night is obscenity Mumbai court ruled | "तू गोरी दिसतेस, ऑनलाइन ये, उद्या भेटू"; माजी नगरसेविकेला रात्री पाठवले मेसेज, कोर्टाने दिली शिक्षा

"तू गोरी दिसतेस, ऑनलाइन ये, उद्या भेटू"; माजी नगरसेविकेला रात्री पाठवले मेसेज, कोर्टाने दिली शिक्षा

Mumbai Court: मुंबईतील एका सत्र न्यायालयाने माजी महिला नगरसेवकाला आक्षेपार्ह मेसेज केल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवत निकाल दिला आहे. रात्रीच्या वेळी अनोळखी महिलेला "तू बारीक आहेस, खूप हुशार आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस" असे मेसेज  पाठवणे म्हणजे अश्लीलता आहे, असा निकाल मुंबईतील सत्र न्यायालयाने दिला आहे. अनोळखी महिलेला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणे, तेही रात्री उशिरापर्यंत हा तिच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्यासारखे आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जी. ढोबळे यांनी या प्रकरणात निकाल दिला. 

२६ जानेवारी २०१६ रोजी ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी पीडिता मुंबईच्या बोरिवली भागातील विद्यमान नगरसेविका होती. नरसिंग गुडे नावाच्या आरोपीने पीडितेच्या व्हॉट्सॲपवर मेसेजमध्ये  “तू झोपली आहेस का? तुमचं लग्न झालंय की नाही? तुम्ही हुशार दिसत आहात. तुम्ही खूप गोऱ्या आहात. मला तुम्ही आवडता! मी ४० वर्षांचा आहे. उद्या भेटू, असे मेसेज केले होते.

माजी नगरसेविकेने हा सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या नंबरवर फोन केला होता. मात्र नरसिंग गुडेने कॉल रिसिव्ह केला नाही आणि त्याऐवजी काही अश्लील फोटोंसह, माफ करा, रात्री कॉल उचलला जाणार नाहीत. मला व्हॉट्सॲप चॅटिंग आवडते, ऑनलाइन या, असा मेसेज केला होता.

"मेसेज आणि फोटो खरोखरच अश्लील होते. आरोपी गुडे आणि पीडित महिला किंवा तिचा पती यांच्यात कोणताही संबंध नव्हता. कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती रात्री ११ ते १२.३० या दरम्यान मोबाईलवर पाठवलेले असे व्हॉट्सॲप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करु शकत नाही. पीडितेला पाठवलेले कथित मेसेज, शब्द, फोटो हे महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करतात," असं कोर्टानं म्हटलं.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हे मेसेज आल्यानंतर तिला लाज वाटली आणि राग आल्याने वाटल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधला. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की अशी कोणतीही घटना घडली नाही आणि फिर्यादी आणि तिच्या पतीसोबत आरोपीचे राजकीय वैर होते.  त्यामुळे तक्रारदाराने आपला राजकीय प्रभाव वापरून खोटा गुन्हा दाखल केला. मात्र, कोर्टाने आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावला. आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून कोणतीही महिला आपली प्रतिष्ठा पणाला लावू शकत नाही. तक्रारदार व तिच्या पतीने दिलेल्या पुराव्यावरून असे सिद्ध होते की, त्या आरोपीने मेसेज आणि अश्लील फोटो पाठवले होते, असं कोर्टानं म्हटलं.

दरम्यान, कोर्टाने गुडेला ठोठावलेली तीन महिन्यांची साधी कैद व दंडाची रक्कम कायम ठेवली. कोर्टाने बोरिवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुडे यांच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले.

Web Title: Sending WhatsApp messages to a woman at night is obscenity Mumbai court ruled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.