शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:27 IST2025-10-28T06:26:52+5:302025-10-28T06:27:18+5:30
नवी मुंबईतील मित्रांच्या मदतीने कारखान्यात लुटीचा डाव आखला

शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
मुंबई : शिवडी नाका येथील बुसा इंडस्ट्रिज इस्टेटमधील लुटीमागे तक्रारदार सुरक्षारक्षकच सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार, रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी सुरक्षारक्षकासह चौकडीला अटक केली. रोहितकुमार मोहेंद्रकुमार शर्मा (२०), मनीष राठोड (२४), भगवान पारसकर उर्फ मामा (६०) आणि मंगल कश्यप (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले अन्य दोन आरोपी पसार आहेत.
सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात २१ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या लुटीत ४० तोळे सोने चोरीला गेले होते. मूळचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेला तक्रारदार रोहितकुमार शर्मा हा प्रदीप दिनेश शर्मा यांच्या दागिने निर्मिती कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानेच नवी मुंबईतील मित्रांच्या मदतीने कारखान्यात लुटीचा डाव आखला. घटनेच्या रात्री सव्वादहा वाजता आरोपी मनीष राठोड हा दोन साथीदारांसह पार्सल देण्याच्या बहाण्याने कारखान्यात शिरला. आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोहितकुमारच्या पायावर वार केला आणि ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या पेटीतून सोन्याचे दागिने लुटून नेले.
नवी मुंबईत एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
तपासात पोलिसांना मिळालेले तांत्रिक पुरावे व घटनास्थळावरील तपशिलांवरून रोहितकुमारच लुटीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी त्याच्यासह आणखी तीन जणांना अटक केली.
अटक आरोपींपैकी तिघे उत्तर प्रदेशातील असून उर्वरित आरोपी महाराष्ट्र, बंगाल आणि नेपाळमधील आहेत. सर्व आरोपी नवी मुंबईतील एका घरात राहत होते व कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते