पार्सल देण्याच्या बहाण्याने शिवडीत सुरक्षारक्षकावर हल्ला; ४० तोळे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:36 IST2025-10-25T10:36:30+5:302025-10-25T10:36:42+5:30
घटनेच्या दिवशी प्रदीप व त्यांचे मित्र हे कारखान्यामध्ये दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजा करण्याकरिता आले होते.

पार्सल देण्याच्या बहाण्याने शिवडीत सुरक्षारक्षकावर हल्ला; ४० तोळे सोने लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवडीतील बुसा इंडस्ट्रिज इस्टेटमध्ये दागिने बनविण्याच्या कारखान्यामध्ये त्रिकुटाने पार्सल देण्याचा बहाणा करून सुरक्षारक्षकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत चाकूने पायावर वार करत ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. २१) रात्री घडली. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवत रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक रोहितकुमार शर्मा (२०) हे जखमी झाले आहे.
शर्मा हे प्रदीप दिनेश शर्मा यांच्या सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात. घटनेच्या दिवशी प्रदीप व त्यांचे मित्र हे कारखान्यामध्ये दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजा करण्याकरिता आले होते.
पूजा संपल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास कारखान्यातून निघून गेले. त्यानंतर रोहितकुमार यांच्यासोबत असणारे दोन मित्र सागर मंडल व तुलान दोलाई हे जेवणासाठी कारखान्यातून खाली निघून गेले. रोहितकुमार हे कारखान्याचा मेन दरवाजा बंद करून पोट माळ्यावर झोपण्यासाठी गेले. रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास कारखान्याचा मुख्य दरवाजा ठोठविल्याचा आवाज आला. त्यावेळी ते तिथे गेले असता दरवाज्याच्या बाहेरून एका तरुण ‘तुम्हारा पार्सल आया है, दरवाजा खोलो’ असे बोलला.
रोहितकुमार यांनी दरवाजा उघडताच त्याच्या पाठीमागून आणखी दोनजण कारखान्यात घुसले. धमकी देत त्यातील एकाने त्याच्या हातातील धारधार सुऱ्याने रोहितकुमार याच्या पायावर वार केला.
अशी केली लूट
रोहितकुमार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडताच तीन आरोपींनी कारखान्यातील ऑफिसमध्ये पूजेच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या पेटीतील सोन्याचे दागिने घेऊन कारखान्यातून पळ काढला. घाबरलेल्या रोहितकुमार यांनी त्यांनी लुटारू निघून गेल्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केली. कारखान्याच्या बाजूला काम करणाऱ्या काही लोकांनी त्याला उपचारांसाठी केईएम रुग्णालयात नेले.