मोठी बातमी! मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:28 IST2022-06-25T15:27:25+5:302022-06-25T15:28:28+5:30
राज्यात सध्या राजकीय उलथापालथ सुरू असताना तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज पत्रक काढून १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे.

मोठी बातमी! मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई-
राज्यात सध्या राजकीय उलथापालथ सुरू असताना तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज पत्रक काढून १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे मुंबईत ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास परवानगी नसेल.
सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व अप्पर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्त यांची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार व महत्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सूचना पोलिसांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात कलम १४४ सीआरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश पाळले जातील याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.