Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:15 IST2025-11-16T15:14:53+5:302025-11-16T15:15:56+5:30
Vakola-BKC Road News: सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तारित प्रकल्प असलेल्या वाकोला ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मार्गाच्या कामाने गती पकडली आहे.

Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचा (एससीएलआर) विस्तारित प्रकल्प असलेल्या वाकोला ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मार्गाच्या कामाने गती पकडली आहे. हा मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडण्यासाठी नुकतेच गर्डर उभारण्यात आले. एमएमआरडीए वाकोला ते बीकेसीदरम्यान १.२ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारत आहे.
सद्यस्थितीत या प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आता उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातील एससीएलआर मार्गावरील केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या कामाने गती पकडली आहे. केबल स्टेड पुलाच्या कामामुळे उड्डाणपुलाचे काम करण्यात अडथळे येत होते.
या ठिकाणी जाण्यासाठी नवा पर्याय एससीएलआर मार्गाच्या या विस्तार प्रकल्पामुळे वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी जंक्शन यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जाण्यासाठी वाहनांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाणाऱ्या वाहनांसाठी नवा पर्याय खुला उपलब्ध होणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत मिळणार आहे.
सांताक्रुझ ते बीकेसी प्रवास पाच ते दहा मिनिटांवर
आता केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे एमएमआरडीएचा वाकोला ते बीकेसी मार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर या उन्नत मार्गाची दहिसर दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एससीएलआरला जोडणी दिली जाणार आहे. दहिसर बाजूने येणारी वाहने सध्याच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलावरून या उन्नत मार्गावर दाखल होऊ शकणार आहेत. हा मार्ग सिग्नल विरहित असेल. तसेच सांताक्रुझ ते बीकेसी प्रवास पाच ते दहा मिनिटांवर येणार आहे.