शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार: आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:14 IST2025-07-17T14:14:31+5:302025-07-17T14:14:31+5:30

BJP Ashish Shelar News: राज्य शासनावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित आहे ,अशी माहितीही त्यांनी दिली.

science and Innovation initiative center to be started in the name of scientist jayant narlikar said ashish shelar | शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार: आशिष शेलार

शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार: आशिष शेलार

BJP Ashish Shelar News: राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये "विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र" (SIAC) स्थापन केले आहेत. आता  उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, अशी घोषणा तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी  विधानसभेत केली. त्यासाठी राज्य शासनावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित आहे ,अशी माहितीही त्यांनी दिली.

भारतीय राज्यघटनेत नागरिकांमध्ये वैज्ञनिक दृष्टिकोन वाढवणे हे एक मूलभूत कर्तव्य मानले आहे. त्या पार्श्वभूमीवर, शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये "विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र" (SIAC) स्थापन केले आहेत. ही योजना यापुढे आता थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे चालवण्यात येणार आहे. अशा प्रकारची सर्व केंद्र शालेय शिक्षणाशी संबंधित सक्षम शैक्षणिक संस्था यांच्या भागिदारीतून आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे नेहरु सायन्स सेंटर, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्यातून उभारण्यात आली आहेत. शालेय शिक्षण कार्यक्रमाला हा पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, एक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.

SIAC ही उपक्रम योजना ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि NEP-२०२० ला पूरक ठरणारी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. ही केंद्रे केवळ शाळांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरणार आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये याचे विस्तार केल्यास भविष्यातील विज्ञानस्नेही महाराष्ट्र घडवणे शक्य आहे. याची अंमलबजावणी व  नियंत्रणासाठी एक व्यावसायिक चमू तयार केला जाईल ज्यात क्यूरेटर, अभियंते, व निवृत्त अधिकारी यांचा समावेश असेल. यासाठी केंद्र शासन, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद व अन्य संस्थांचा सहभाग असेल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

काय आहेत उद्दिष्टे
 
विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र (SIAC) केंद्रांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग, मॉडेल्स, रोबोटिक्स, ३० प्रिंटिंग, कोडिंग इत्यादींचा परिचय करून दिला जातो, यामधूनःवैज्ञानिक समज व कौशल्ये विकसित होतात. कुतूहल, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्ये वाढतात. शिक्षकांना प्रशिक्षण व शैक्षणिक साधनसामग्रीचा उपयोग मिळतो.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध होतात.

आत्तापर्यंतची प्रगती

महाराष्ट्र राज्यात विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र आत्तापर्यंत ६ जिल्ह्यांमध्ये वारणानगर, प्रवरानगर, अमरावती, सातारा, बारामती, देवरुक या ठिकाणी सुरु केली असून नांदेड, अकोला व परभणी या ३ जिल्ह्यात केंद्र सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये लाखो विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले आहेत. याचे अनुभव सकारात्मक असून विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विशेष प्रतिसाद लाभला आहे. सदर विद्यार्थी हिताचा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रभर पुढील पाच वर्षात प्रत्येक जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असून तसेच विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्यास मानवंदना अर्पित करीत आहोत.

 

 

Web Title: science and Innovation initiative center to be started in the name of scientist jayant narlikar said ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.