‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:21 AM2020-08-04T05:21:20+5:302020-08-04T05:55:00+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची ‘लोकमत’शी बातचीत

Saying ‘boycott China’ would be like committing suicide, raghunath mashelkar | ‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल

‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : आत्मनिर्भर भारत ही संकल्पना चांगली आहे. आपण ५९ चायनीज अ‍ॅपवर बंदी घातली हे चांगले झाले. त्यातून पाच नवे भारतीय स्टार्टअप उभे राहिले. पण काही गोष्टी अशाही आहेत की त्यावर आपण ‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व सीएसआयआरचे माजी अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

आत्मविश्वास असल्याशिवाय आत्मनिर्भर होता येणार नाही. त्यासाठी आत्मसन्मान हवा आणि म्हणून आता मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल. आपण बाहेरून वस्तू आणून त्या इथे असेंबल करणे म्हणजे मेक इन इंडिया नाही. आपल्याला घाम गाळून मेहनत करणारेही हवे आहेत आणि नवनवीन शोध करून पैसा उभे करणारेदेखील. त्यादृष्टीने मेक इन इंडियाची व्याख्या करावी लागेल, असेही माशेलकर म्हणाले. जेनरिक उत्पादनात आपण जगात एक नंबर आहोत, पण फार्मा उद्योगाला लागणारे एपीआय (अ‍ॅक्टिव्ह फार्मासिटीकल इन्ग्रियन्टस) ७० टक्के चायनामधून येते. उद्या जर आपण बायकॉट चायना केले तर आपली फार्मा इंडस्ट्री शून्यावर येईल. त्यासाठी आपण ‘कमीतकमी चायना’ ही भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
जगाच्या तुलनेत आपण इनोव्हेशन्समध्ये कुठे आहोत? आपली तयारी किती आहे? ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये आपण सहा वर्षांपूर्वी जगात ८१ व्या नंबरवर होतो. आज आपण ५२ वर आलो, पण चायना पहिल्या ३० मध्ये गेला. कारण सतत नवनवीन शोध करणे त्यांनी सुरू ठेवले आहे. आपण सकाळी उठून २१ वर्षांच्या मुलाला तू आता इनोव्हेशन कर, असे सांगून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी मुलांची तयारी शाळेपासून करून घ्यावी लागेल. नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या क्रियेटिव्हीटीवर भर दिला आहे. आपल्याकडे तसे शिक्षक तयार करावे लागतील त्याचे काय? नवे शिक्षक नव्या पद्धतीने तयार करावे लागतील. शिक्षकांचे कामच येत्या काळात बदलून जाणार आहे. शिक्षकांच्या भूमिका पूर्णपणे बदलतील. येत्या काळात डिजिटल आणि फिजिकल शिक्षण मुलांना द्यावे लागेल. त्यासाठीचे शिक्षक तयार करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यात असेल, असे ते म्हणाले.

ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन हे गुगलच्या माध्यमातून होईलही पण मूल्य संवर्धन होणार नाही. त्यासाठी डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही गोष्टींची येत्या काळात गरज पडेल.

ही संपूर्ण मुलाखत लोकमत
यू ट्युबवर ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात आज रात्री
९ वाजता पाहता येईल.

Web Title: Saying ‘boycott China’ would be like committing suicide, raghunath mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.