Join us

पोलिसांपासून माझ्या बाबांना वाचवा, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 03:00 IST

अश्विनी बिद्रे यांच्या कन्येचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

पनवेल : माझ्या आईचा खून पोलिसांनीच केला आहे... मी सहा वर्षांची असताना माझी आई गेली, तिचा मृतदेह मिळविण्यासाठी व खुन्याला अटक करण्यासाठी मुंबईला माझ्या बाबांसह फेऱ्या मारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला नक्कीच न्याय देतील, असे पत्र अश्विनी बिद्रे-गोरे यांची १० वर्षीय कन्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

अनेक वेळा प्रयत्न करूनही आईचा मृतदेह आम्हाला मिळाला नाही. पैसे नसल्यामुळे मृतदेह शोधला गेला नाही. पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांच्यामुळे आईची हत्या करणारे आरोपी तुरुंगात आहेत. माझे बाबा हा खटला लढण्यासाठी वारंवार मुंबईला येत असतात. अशावेळी त्यांच्या जीवालाही पोलिसांपासून धोका निर्माण झाला आहे. मुंबईला जाताना ते नेहमी रात्री घराबाहेर पडतात. माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत. बाबांना पोलीसच मारतील. त्यामुळे माझ्या बाबांना मला परत करा. माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या, अशी भावनिक साद चिमुकल्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. हातकणंगले येथील एका शाळेमध्ये सिद्धी सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला भेट मिळावी, अशी विनंती केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आईच्या खून प्रकरणात खूप मदत केली आहे. त्यांचे मी आभार मानते. मला शिवशाहीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायची इच्छा आहे. आमच्यावर झालेला अन्याय सांगण्यासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे. माझे म्हणणे ऐकाल ना..? अशा स्वरूपाचे पत्र सिद्धीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

टॅग्स :मुंबईमुख्यमंत्रीपोलिस