Join us  

चेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 8:04 PM

'सध्या, आमच्या शिवडी गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह सर्वचजण लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात सुरक्षेसाठी गावात काम करत आहेत.

मुंबई - सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तर, छत्रपती संभाजीराजे यांनीही अक्षयला फोन करुन धीर दिलाय. याप्रकरणी आता साखर कारखान्याचे चेअरमन व मारहाणीचा आरोप असणाऱ्या सत्यशील शेरकर यांनी आपली बाजू मांडली आहे. 

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसरी बाजू पडताळण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आता, सत्यशील शेरकर यांनी आपली बाजू मांडताना, मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. 

'सध्या, आमच्या शिरवली गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह सर्वचजण लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात सुरक्षेसाठी गावात काम करत आहेत. अक्षय बोराडे यांच्या घरातील शेडजवळ ४० ते ५ मनोरुग्ण आहेत. हे मनोरुग्ण दुपारी, रात्री, पहाटे केव्हाही बाहेर पडतात. विशेष म्हणजे या मनोरुग्णांची कुठलिही तपासणी केली नाही. अद्यापही अक्षय हे मनोरुग्ण आणतच आहेत, ४ ते ५ दिवसांपूर्वी अक्षय यांनी मंचर येथून एक मनोरुग्ण गावात आणला. यासंदर्भात आम्हाला माहिती मिळाली, तसेच तो रुग्ण कोरोनासदृश्य असल्याचंही कळालं, असे सत्यशील शेरकर यांनी सांगितलं. 

विशेष म्हणजे मंचरच्या त्या रुग्णालयातूनच फोन आला होता की, तो कोरोनासदृश्य रुग्ण आहे. त्यामुळे, त्या रुग्णाला पुण्याला हलविण्यात आले.  पुढे त्या रुग्णाचं काय झालं हे आम्हाला माहिती नाही, तो पॉझिटीव्ह होती की निगेटीव्ह हेही माहिती नाही. मात्र, पुढे गावात असं काही घडू नये, यासाठी आम्ही अक्षयला बोलावून घेतलं होतं. त्यानंतर, या मनोरुग्णांची व्यवस्थित काळजी घे, गावाचीही काळजी घेणं आवश्यक आहे, असं आम्ही त्याला सांगितलं. मात्र, आम्ही त्याच्या कामावर आक्षेप घेतोय, असा समज त्याचा झाला. त्यातून त्याने आम्हाला अरेरावीची भाषा केली, शिवीगाळ करत तो निघून गेला. त्यानंतर, फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ करुन त्याने आमच्यावर मारहाणीचे आरोप केल्याचं शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. 

गावातील लोकांच्या काळजीपोटी तू मनोरुग्णांची आणि गावातील सर्वांच्याच आरोग्याचे हित लक्षात घेऊन काम करण्याचा सल्ला आम्ही त्याला दिला. त्याच्यामुळेच आमची बदनामी झाली, तरी अद्याप आम्ही कुठलिही तक्रार पोलिसात दाखल केली नाही. तसेच, आमच्यावर केलेले मारहाणीचे आरोप खोटे असून त्याने पुरावे सादर करावे, असेही शेरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी उदयनराजे भोसेले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी अक्षयला आधार दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून, अक्षय तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असे म्हटलंय. तसेच, अक्षयला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचनाही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय.  

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेगुन्हेगारीजुन्नरपोलिसकोरोना वायरस बातम्या