मुंबईत उद्या ठरणार ‘सरपंच ऑफ द इअर’; यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:18 IST2025-07-02T06:17:56+5:302025-07-02T06:18:26+5:30
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यातील २४ जिल्ह्यांतील सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले सरपंच अंतिम सोहळ्यासाठी पात्र ठरले आहेत.

मुंबईत उद्या ठरणार ‘सरपंच ऑफ द इअर’; यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा
मुंबई : विकासाची मुळे तळागाळापर्यंत घेऊन जात ग्रामकल्याणासाठी झटणारा ग्रामीण व्यवस्थेचा कणा म्हणजे सरपंच. या सरपंचांचे कार्य जनतेसमोर आणणारा व त्यांचा यथोचित गौरव करणारा अनोखा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’. बीकेटी प्रस्तुत व लोकमत आयोजित हा पुरस्कार सोहळा गुरुवार, ३ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या भव्य सोहळ्यात मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे.
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यातील २४ जिल्ह्यांतील सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले सरपंच अंतिम सोहळ्यासाठी पात्र ठरले आहेत.
लोकमत समुहाचे एडिटर इन चीफ व माजी उद्योग आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ‘लोकमत’ने ‘सरपंच अवॉर्ड’ सुरू केले आहेत. गावातील जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन - लोकसहभाग, रोजगार, कृषी या १४ विभागांत सरपंचांनी केलेल्या कामावर आधारित प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जातो. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाऱ्या सरपंचासाठी ‘सरपंच ऑफ द इअर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील गावबदलाची धडाडी घेऊन आश्वासक काम उभे करणाऱ्या सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील विजेत्यांमधून राज्यस्तरावरील पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्यात आली होती.
या मंत्र्यांची उपस्थिती
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम .
हे आहेत प्रायाेजक
बीकेटी हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. संतूर, मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंडस् आणि एमपी बिर्ला सिमेंट परफेक्ट प्लस हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. महाधन हे फर्टिलायझर पार्टनर आहे. ॲन इनिशिएटिव्ह बाय टॅप लाइट.
कधी, कुठे? : गुरुवार,
दिनांक ३ जुलै २०२५
स्थळ: यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ : सकाळी १०:३०