Join us

Sanjay Raut press conference : कुणाची झोप उडेल हे संजय राऊतांना पत्रकार परिषदेपूर्वीच कळेल, भाजपा नेते प्रसाद लाड यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:43 IST

Sanjay Raut press conference : आजच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असा दावा राऊत यांनी केला आहे. तेव्हापासून भाजपाचे हे साडेतीन नेते कोण, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

मुंबई - भाजपाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवसेनेच्या नेत्यांवर करण्यात येत असलेले आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांना शिवसेना नेते संजय राऊत हे आज प्रत्युत्तर देणार आहे. संध्याकाळी चार वाजता शिवसेना भवनामध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मोठे गौप्यस्फोट करण्याचा आणि त्यानंतर भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असा दावा राऊत यांनी केला आहे. तेव्हापासून भाजपाचे हे साडेतीन नेते कोण, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, तुमच्या धमक्यांना भाजपा घाबरणार नाही. आज मुंबईत ईडीचे दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्ड संदर्भात मुंबईमध्ये धाडसत्र सुरू आहे. त्यामधून येणाऱ्या माहितीमधून अनेक नेत्यांची झोप उडणार आहे. त्यामुळे कोणाची झोप उडेल हे चार वाजण्याआधीच संजय राऊत यांना समजणार आहे, असे प्रसाद लाड म्हणाले. संजय राऊत हे साडेतीन नावाचा काही चित्रपट काढणार आहेत का, असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान, संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे साडे तीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत जातील आणि अनिल देशमुख बाहेर येतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे, त्यामुळे हे साडे तीन नेते कोण याबाबतची उत्सुकता वाढली आहे. त्यातच ही पत्रकार परिषद केंद्रीय तपास यंत्रणा आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी पाहावी, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे. 

टॅग्स :संजय राऊतप्रसाद लाडशिवसेनाभाजपा