Join us  

ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले...तिसरा येऊन जाऊन असतो - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 10:56 AM

मोदी आडनावामुळे टीकाकारांना आयती संधी मिळाली असून सोशल मीडियावर अनेकजण यासंबंधी पोस्ट करत आहेत

मुंबई -  पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्या नावामुळे अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधी साधत आहेत. मोदी आडनावामुळे टीकाकारांना आयती संधी मिळाली असून सोशल मीडियावर अनेकजण यासंबंधी पोस्ट करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत टोला हाणला आहे. ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले...तिसरा येऊन जाऊन असतो असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. काही वेळाने हे ट्विट त्यांनी डिलीट केलं. संजय राऊत यांनी नीरव मोदींच्या निमित्ताने नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी एक ट्विट केलं होतं. एक ट्विट करत त्यांनी पैसे बॅंक मे रखो तो नीरव मोदी का डर..घर मे  रखो तो नरेंद्र मोदी का..असं खिल्ली उडवणारं ट्विट त्यांनी केलं होतं. 

संजय राऊत यांच्या टीकेला भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, "मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!!'.

 

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदी सरकारवर घणाघाती टीका करत नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा अशी उपरोधिक टीका केली आहे. कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत, अशा शब्दात सामना संपादकीयमधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल!, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

टॅग्स :संजय राऊतआशीष शेलारनीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळा