Join us  

हा एवढा माज कुठून आला?; मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:53 AM

मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले, संजय राऊतांचा आरोप

मुंबई – मुलुंडमधील शिवसदन सोसायटीत मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून वाद चिघळला आहे. या घटनेतील पीडित महिला तृप्ती देवरुखकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर व्हिडिओ टाकला. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. मुलुंडमध्ये ऑफिससाठी जागा शोधायला गेलेल्या तृप्ती यांना आलेला भयानक अनुभव त्यांनी शेअर केला. त्यानंतर या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, हा एवढा माज कुठून आला? मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंदे महा मंडळाने द्यायला हवे. भाजपानेशिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी. मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र असा इशारा त्यांनी देत भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधला.

मनसेचा उद्धव ठाकरे गटावर आरोप

"केम छो  वरळी "होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तृप्ती देवरुखकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलुंड येथील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने शिवसदन सोसायटीत दाखल होत मनसे स्टाईलनं जाब विचारला. त्यानंतर संबंधित सोसायटीच्या सेक्रेटरीने मराठी माणसांची हात जोडून माफी मागितली.

सरकारने घेतली दखल

मुलुंड परिसरात मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकाराची आयोगाने दखल घेत सहकार आयुक्त आणि गृहनिर्माण विभागाला चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह  संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असे असले तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामनसेभाजपा