Join us

Sanjay Raut: मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का? राऊतांना प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:41 IST

आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस' आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई - राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं असताना शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात मशिदींमध्ये बेकायदेशीर भोंगे नाहीत. पण, आज राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्येही पहाटे काकड आरती होऊ शकलेली नाही, असे म्हणत राज यांच्यावर हिंदुत्त्वावरुन टिका केली. आता, राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे.  

आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस' आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. "भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. याआधी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्यामागे भाजपाचाच हात आहे आणि आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे. राज ठाकरेंनी डोकं ठिकाणावर ठेऊन वक्तव्य करावीत, तुम्हाला हिंदुत्त्व शिकवणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या. त्यांची डिग्री बोगस आहे का, ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत, असेही राऊत यांनी म्हटले. 

राऊत यांच्या या टिकेला आता चित्रा वाघ यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. ''आमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचे धडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून गिरवले आहेत. त्यांची हिंदुत्वाची डिग्री बोगस होती, त्यांनी चुकीचे धडे शिकवले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सर्वज्ञानी संपादकजी, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. 

सर्वाधिक फटका हिंदूंना - राऊत

"ज्या गोष्टी भाजपाला जमत नाहीत. अशा गोष्टी लहान पक्षांना हाताशी घेऊन गेल्या जात आहेत. भाजपाने आज राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी करुन घेतला आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे. आज जर सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदूंना बसला आहे. पहाटेच्या काकड आरतीला अनेक मंदिरांमध्ये केवळ मोजक्या लोकांनाच उपस्थित राहता येत असतं. पण मंदिरांवरील लाऊडस्पीकरवरुन परिसर आणि गावातील लोक काकड आरतीचे साक्षीदार होत असतात. आजच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्ये काकड आरतीही झालेली नाही. याची नाराजी अनेक हिंदूंनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. आज राज्यात शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतचित्रा वाघराज ठाकरेबाळासाहेब ठाकरे